माहितीअभावी डीएनए सॅम्पलसाठी नातेवाईक ताटकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST2021-06-09T04:14:26+5:302021-06-09T04:14:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उरवडे येथील एसव्हीएस कंपनीत लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांचे डीएनए ...

Relatives rushed for DNA samples due to lack of information | माहितीअभावी डीएनए सॅम्पलसाठी नातेवाईक ताटकळले

माहितीअभावी डीएनए सॅम्पलसाठी नातेवाईक ताटकळले

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : उरवडे येथील एसव्हीएस कंपनीत लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांचे डीएनए सॅम्पल घेण्यासाठी ससून रुग्णालयात आलेल्यांना व्यवस्थित माहिती न पोहोचल्याने ताटकळत थांबावे लागले. त्यातून पोलीस आणि नातेवाईकांमध्ये वाद झाला. सकाळी दहा वाजता डीएनए सॅम्पलसाठी आलेल्या नातेवाईकांना दुपारी ४ पर्यंत थांबावे लागले होते.

याबाबत ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मुरलीधर तांबे यांनी सांगितले की, डीएनए सॅम्पल घेण्यासाठी वेगळी प्रक्रिया असते. ही प्रक्रिया पोलिसांकडून पूर्ण करण्याची आवश्यकता असते. त्याची संपूर्ण माहिती पोलिसांना काल रात्रीच देण्यात आली होती. मात्र, ती बहुदा त्यांच्यापर्यंत न

पोहोचल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात उशीर झाला असावा. ससून रुग्णालयात दुपारी १ वाजता सॅम्पल घेण्यास सुरुवात झाली व ती दुपारी ४ वाजता पूर्ण झाली.

असा घेतला जातो डीएनए सॅम्पल

अन्य सॅम्पल आणि डीएनए सॅम्पल यामध्ये खूप फरक आहे. डीएनए सॅम्पलसाठी आवश्यक असलेले किट हे पाषाण येथील रासायनिक प्रयोगशाळेतून आणावे लागते. डीएनए सॅम्पलसाठी एक फॉर्म असतो. त्यावर ज्या व्यक्तीचा सॅम्पल घेतला जाणार आहे, त्याचा फोटो व दोन साक्षीदार आवश्यक असतात. तो फॉर्म पूर्ण भरल्यानंतर पोलीस तो ससून रुग्णालयातील सबंधितांकडे देतात. त्यानंतर फॉर्मवरील ज्या व्यक्तीचा फोटो आहे, तीच व्यक्ती आहे ना, याची खात्री करून ससूनमधील डॉक्टर सॅम्पल घेऊन ते किट पुन्हा पोलिसांच्या हवाली करतात. त्यानंतर पोलीस हे सॅम्पल रासायनिक प्रयोगशाळेत दाखल करतात. त्यानंतर तेथे मृत व्यक्तीचे सॅम्पल आणि हे सॅम्पल याची तपासणी करून ओळख पटविली जाते.

पोलिसांनी संबंधितांच्या नातेवाईकांना आज सकाळी १० वाजता सॅम्पलसाठी ससून रुग्णालयात बोलवले. मात्र, पोलिसांनी आपल्याबरोबर किट आणले नव्हते. ते पुन्हा किट आणण्यासाठी पाषाण येथील प्रयोगशाळेत गेले. तेथून किट घेऊन आल्यानंतर संबंधितांचे फोटो काढून फॉर्म भरण्यात आला. त्यानंतर त्यांचे सॅम्पल घेण्यास सुरुवात झाली. या सर्व प्रक्रियेमुळे कालच्या घटनेने दु:खाचा डोंगर कोसळलेल्या नातेवाईकांना अशा परिस्थिती ताटकळत राहावे लागले.

Web Title: Relatives rushed for DNA samples due to lack of information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.