बीआरटीसाठी पदपथाची रूंदी कमी करणार
By Admin | Updated: June 17, 2014 03:04 IST2014-06-17T03:04:54+5:302014-06-17T03:04:54+5:30
बीआरटी प्रकल्प पूर्ण होण्याअगोदरच त्यातील त्रुटींबद्दल चर्चा होऊ लागली आहे.

बीआरटीसाठी पदपथाची रूंदी कमी करणार
पिंपरी : बीआरटी प्रकल्प पूर्ण होण्याअगोदरच त्यातील त्रुटींबद्दल चर्चा होऊ लागली आहे. ग्रेड सेपरेटर, तसेच बाजूचा बसमार्ग, बसमार्गालगतचा अरुंद झालेला रस्ता ही परिस्थिती वाहतूक सुलभीकरणास उपयुक्त ठरण्याऐवजी अपघातास निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरेल, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होऊ लागल्याने पदपथांची रुंदी कमी करून दोन्ही बाजूने रस्ता रुंदीकरण करण्याचा पर्याय निवडला आहे, असे आयुक्त राजीव जाधव यांनी सांगितले.
बीआरटी प्रकल्प, ग्रेड सेपरेटर प्रकल्पातील त्रुटी निदर्शनास आणून देणारे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. पुणे -मुंबई महामार्गावर पिंपरी-चिंचवड हद्दीत महापालिकेने राबविलेले दोन्ही प्रकल्प वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडविण्यास कसे कारणीभूत ठरतात, ही वस्तुस्थिती ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिली होती. तांत्रिकदृष्ट्या झालेल्या चुका सुधारण्याची आवश्यकता असल्याची नागरिकांची मते नोंदवली होती. त्याची आयुक्तांनी दखल घेतली असून, उपाययोजनांना प्राधान्य दिले आहे.
सध्या बीआरटी मार्गावर बसथांबे उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतुकीस अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आयुक्त जाधव यांनी त्यात आवश्यक ते बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात बीआरटी मार्गावर निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत, तर दुसऱ्या टप्प्यात पिंपरी ते दापोडीपर्यंत दोन्ही बाजूंना आणखी एक लेन तयार करण्याचे विचाराधीन आहे. युद्धपातळीवर ते काम केले जाणार आहे. सध्या अस्तित्वात असलेले पदपथ वापरात येत नाहीत. रस्त्याकडेचे दुकानदार या पदपथांचा वापर करतात. पदपथांची रुंदी कमी करून रस्ता रुंदीकरणाचा पर्याय आहे. आयआयटी, पवई संस्थेने सुचविलेल्या सुधारणा केल्या जातील. बीआरटी मार्गावर सर्व्हिस लेनलगत सायकल ट्रॅक, पदपथ प्रस्तावित आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)