महापालिकेच्या अंदाजपत्रकास मुख्यसभेत मान्यता
By Admin | Updated: March 18, 2015 00:35 IST2015-03-18T00:35:16+5:302015-03-18T00:35:16+5:30
शहराचा समतोल साधण्याच्या नावाखाली स्थायी समिती अध्यक्षांनी नगरसेवकांमध्ये भेदभाव करून अंदाजपत्रक मांडले आहे.

महापालिकेच्या अंदाजपत्रकास मुख्यसभेत मान्यता
पुणे : शहराचा समतोल साधण्याच्या नावाखाली स्थायी समिती अध्यक्षांनी नगरसेवकांमध्ये भेदभाव करून अंदाजपत्रक मांडले आहे. उत्पन्नवाढीचे कोणतेही उपाय न सुचविता केवळ स्वप्नांचे इमले बांधण्याचा घाट घालत योजना सादर केल्या असल्याची जोरदार टीका महापालिकेच्या 2015-16 च्या अंदाजपत्रकावर मंगळवारी मुख्यसभेत करण्यात आली. त्यानंतर तब्बल साडेसहा तासांच्या चर्चेनंतर अवघ्या 16 नगरसेवकांच्या उपस्थितीत 4 हजार 789 कोटींच्या या अंदाजपत्रकास एकमताने मान्यता देण्यात आली. मात्र, या वेळी नाराज असलेल्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी अंदाजपत्रक सादर करणाऱ्या बापूराव कर्णेगुरुजी यांचा चांगलाच समाचार घेत अंदाजपत्रकातील त्रुटींची जंत्रीच मांडली.
स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी खास सभेला 4 हजार 479 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यास आज
मुख्यसभेत मान्यता देण्यात आली. या चर्चेत 152मधील केवळ 18 नगरसेवकांनी सहभाग घेतला. त्यातही जवळपास 12 नगरसेवक विरोधी पक्षाचे असल्याने त्यांनी अंदाजपत्रकातील तरतुदी आणि नगरसेवकांना केलेल्या समान निधी वाटपावरून कर्णेगुरुजी यांच्यावर निशाणा साधला.
शहरामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत मात्र ठरावीक नगरसेवकांच्या प्रभागात कोट्यवधींचा निधी देऊन उधळण केली आहे. तर काही नगरसेवकांना लाखोंचा निधी देऊन बोळवण केली आहे.
सत्ताधारी पक्षांच्या
नगरसेवकांना आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांना अंदाजपत्रकात तरतूद देताना दुजाभाव करण्यात आला आहे. प्रभागामध्ये पुरुष नगसेवकाला
जास्त आणि महिला नगरसेविकांना
कमी निधी असा भेदभाव स्थायी
समिती अध्यक्षांनी केला
असल्याचा आरोप या वेळी
करण्यात आला तसेच सर्वांना समान निधी देण्याची मागणी करण्यात आली.
‘सर’ असे का केले...
४विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी अंदाजपत्रकाचा चांगलाच समाचार घेतला. अंदाजपत्रकात प्रशासनास अनेक ठिकाणी जादा उत्पन्न मिळाले असताना, त्यांनी पुढील अंदाज कमी धरल्याचा तर स्थायी उत्पन्न नसतानाही अंदाज फुगविल्याची टीका शिंदे यांनी केली. या वेळी कर्णेगुरुजी यांनी आपल्या भाषणात, आपण हाडाचे शिक्षक आहोत अशा केलेल्या उल्लेखाचा दाखला देत, गुरूजींनी सर्व वर्गाचा विचार न करता काही विद्यार्थ्यांचाच विचार केल्याचा दाखला देत, ‘ सर असे का केले’ हे वाक्य वारंवार उच्चारून कर्णेगुरुजी यांच्यावर टीका केली. त्यामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला होता.
सर्वांना समान न्याय देणार
नगरसेवकांच्या भाषणानंतर माजी स्थायी समिती अध्यक्षांनी आपल्या भाषणात अंदाजपत्रक हे चलनी नाणे असून, सर्वपक्षीय नगरसेवकांना वार्गीकरणाद्वारे निधी उपलब्ध करून देऊन समान न्याय देणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच प्रत्येकाच्या मागणीनुसार, निधी देण्याचा प्रयत्न केला असल्याचेही सांगितले.