कवितेतून प्रकटावे वास्तवाचे गीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST2021-07-23T04:09:19+5:302021-07-23T04:09:19+5:30

- डॉ. रामचंद्र देखणे : प्रा. अशोककुमार पगारिया लिखित ''कथा कोरोनाची, लढा कोरोनाशी'' काव्यसंग्रहाचे प्रकाशन पुणे : "झाडाची मुळे ...

Reality songs should be revealed through poetry | कवितेतून प्रकटावे वास्तवाचे गीत

कवितेतून प्रकटावे वास्तवाचे गीत

- डॉ. रामचंद्र देखणे : प्रा. अशोककुमार पगारिया लिखित ''कथा कोरोनाची, लढा कोरोनाशी'' काव्यसंग्रहाचे प्रकाशन

पुणे : "झाडाची मुळे जमिनीत खोलवर पसरून पाणी शोषून घेतात, तशी अनुभवाची पाळेमुळे खोलवर रुजावीत. जाणिवेतून लिहिलेले साहित्य पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा देत असते. कवीच्या जाणिवा भक्कम असाव्यात. विश्व जागवण्याचे आणि वास्तवाला मांडण्याचे गीत कवीच्या अंत:करणातून प्रकट व्हायला हवे," असे विचार साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.

प्रा. अशोककुमार पगारिया लिखित, वेदांत प्रकाशन प्रकाशित ''कथा कोरोनाची, लढा कोरोनाशी'' काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. देखणे यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे होते. प्रसंगी साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवडचे शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, कवी चंद्रकांत वानखेडे, डॉ. ललित धोका, वेदांत प्रकाशनचे सुनील गायकवाड, सचिन बेदमुथा, रुचिरा सुराणा, प्रा. प्रकाश कटारिया, विजय पारख, नितीन चोपडा, राजेंद्र धोका, प्रकाश पगारिया, भवरीलालजी खिंवसरा, अभय बोथरा, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते. प्रा. पगारिया यांनी काव्यसंग्रह नुकत्याच निधन पावलेल्या भगिनी विजयाबाई बेदमुथा यांना समर्पित केल्याचे सांगून त्यांचे भाचे सचिन बेदमुथा, कविता बेदमुथा व छाया बेदमुथा यांना हा काव्यसंग्रह प्रदान केला.

प्रकाश रोकडे म्हणाले, “हा काव्यसंग्रह प्रतिभा आणि संवेदना यांचा संगम आहे. कोरोनासारख्या गंभीर विषयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत उत्कृष्ट काव्याविष्कार शब्दबद्ध केले आहेत. वास्तविकतेला सामाजिक जाणिवेची जोड देत केलेले लेखन हृदयस्पर्शी आहे."

चंद्रकांत वानखेडे यांनी काव्यसंग्रहाची समीक्षा करत काव्य गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. डॉ. ललित धोका यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील गायकवाड यांनी प्रास्तविक केले. विलासकुमार पगारिया यांनी आभार मानले.

Web Title: Reality songs should be revealed through poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.