धायरीतील समस्यांना आज फुटणार वाचा

By Admin | Updated: January 14, 2015 03:25 IST2015-01-14T03:25:11+5:302015-01-14T03:25:11+5:30

प्रभागातील कचरा, आरोग्य, वाहतूक, पाणी व ड्रेनेज आदी समस्यांवर या वेळी चर्चा होणार आहे.

Read the problems of Dhayri today | धायरीतील समस्यांना आज फुटणार वाचा

धायरीतील समस्यांना आज फुटणार वाचा

पुणे : सिंहगड रस्ता, धायरी फाटा व गावठाण येथील प्रभाग क्रमांक ५४ मधील विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन बुधवारी (दि. १४) गणेशनगर येथील मुक्ताई गार्डनमध्ये सायंकाळी ४ ते ६ या वेळेत करण्यात आले आहे. प्रभागातील कचरा, आरोग्य, वाहतूक, पाणी व ड्रेनेज आदी समस्यांवर या वेळी चर्चा होणार आहे.
शहरातील कचरा, नदी सुधारणा, टेकड्यांचा ऱ्हास, आरोग्याची हेळसांड या प्रमुख समस्यांविषयी ‘लोकमत’ने ‘आता बास’ ही मोहीम राबविली. त्यापुढचे पाऊल म्हणून ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या हद्दीत समावेश झाल्यानंतर प्रामुख्याने सिंहगड रस्त्याच्या परिसराचा विकास झाला. त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढली. त्या तुलनेत मूलभूत सोयी-सुविधा निर्माण झाल्या नाहीत. त्यामुळे प्रामुख्याने सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडी ही प्रमुख समस्या असून, उड्डाणपुलाचे काम झाल्यानंतरही वाहतुकीचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही.
प्रभाग क्रमांक ५४ मध्ये धायरी गावठाणचा परिसर येतो. महापालिकेत या भागाचा समावेश झाल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प व सोसायट्या उभ्या राहिल्या. मात्र, परिसरात उद्यान, मैदान, सुसज्ज दवाखाना, आधुनिक सुविधा असलेली भाजी मंडई आदी सार्वजनिक सुविधा निर्माण झाली नाही. या भागात महापालिकेचा एकही महत्त्वाचा प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. मात्र, कचरा, सांडपाणी, पाणीपुरवठा, रस्त्याची दुरवस्था व अनधिकृत बांधकामे आदी समस्यांना नागरिकांना समोरे जावे लागत आहे. या प्रभागातील विविध प्रश्नांना वाचा फोडून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या वेळी स्थानिक नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नगरसेविका युगंधरा चाकणकर, सहायक आयुक्त जयंत भोसेकर आदी उपस्थित राहणार आहेत. तरी प्रभागातील नागरिकांना उपस्थित राहून लेखी स्वरूपातही समस्या मांडण्याची संधी मिळणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Read the problems of Dhayri today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.