विमानतळाचे फेरसर्वेक्षण डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:30 IST2020-12-04T04:30:38+5:302020-12-04T04:30:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेसाठी फेरसर्वेक्षणाचे काम सुरू ...

विमानतळाचे फेरसर्वेक्षण डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेसाठी फेरसर्वेक्षणाचे काम सुरू आहे. हे काम येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी दिली.
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सध्या निश्चित केलेल्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात बागायत क्षेत्र बाधित होत असल्याने शेतकऱ्यांनी विरोध करत जागेमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. यामध्ये थेट शरद पवार यांनी लक्ष घालून संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी यांची मुंबईत बैठक घेऊन जागा बदला संदर्भात पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. पवार यांच्या सूचनेनुसार सर्वेक्षणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. हे सर्वेक्षण डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात येणार आहे. शेजारील गावातील जागेचा पर्यायही तपासण्यात येत आहे. स्थानिकांनी पांडेश्वर, रिसे, पिसे गावात कमी बागायती क्षेत्र
असल्याने या परिसरातील या जागेचा पर्याय निवडावा, असे सुचविले आहे. यापूर्वी प्रशासनाने पारगाव १,०३७, खानवडी ४८४, कुंभारवळण ३५१, वनपुरी ३३९, उदाचीवाडी २६१, एखतपूर २१७, मुंजवडी १४३ हेक्टर जमीन संपादनाचे नियोजन केले होते. मात्र आता फेरसर्वेक्षणामध्ये कोणत्या गावातील किती जमिनीचे संपादन करायचे हे ठरणार आहे. लॉकडाऊनच्या काळात ‘एमएडीसीने विमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. यामध्ये भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनींचे नकाशे, गट क्रमांक, परताव्याचे प्रस्ताव, बाधितांची संख्या, कुटुंबसंख्या ही माहिती संकलित केली आहे. याचबरोबर निधीसाठीदेखील शासंनाची मदत लागणार आहे.