रेशनिंगचा काळाबाजार

By Admin | Updated: May 18, 2015 23:04 IST2015-05-18T23:04:57+5:302015-05-18T23:04:57+5:30

पुरंदर तालुक्यात अगदी महसूल विभागाच्या सहकार्याने खुलेआम रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे.

Rationing black market | रेशनिंगचा काळाबाजार

रेशनिंगचा काळाबाजार

सासवड : पुरंदर तालुक्यात अगदी महसूल विभागाच्या सहकार्याने खुलेआम रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे. वनपुरी गावचे माजी सरपंच आणि सोसायटीचे चेअरमन एकनाथ महादेव कुंभारकर यांच्या घरात स्वस्त धान्य दुकानातील तब्बल ३६५ पोती तांदूळ आढळून आला आहे. तसेच, सासवड येथील छाप्यात ट्रकसह १०० पोती गहू सापडले. पोलीस आणि महसूल यांनी संयुक्तपणे कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार होत असल्याची तक्रार भाजपा युवाध्यक्ष साकेत धनंजय जगताप यांनी महसूल विभागाकडे केली होती. मात्र, याची दखल घेतली जात नव्हती. म्हणून त्यांनी व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुमारे तीन महिन्यांपासून सापळे लावले होते.
आज सोमवार, दि. १७ रोजी तांदूळ कुंभारकर यांचेकडे जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जगताप यांनी सहकार्यासह थेट त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्या वेळी ट्रक दारात उभा होता. त्यामधून तांदूळ उतरविण्याचे काम सुरू होते. त्यांना पाहताच चालकाने धूम ठोकली व पळून गेला. त्यानंतर त्यांनी तहसीलदार संजय पाटील यांना याबाबत खबर दिली, त्यांनी नायब तहसीलदार दिनेश पारगे यांना तेथे पाठविले. तसेच पुरवठा निरीक्षक चिंतामणी दत्तात्रय जगताप, गोडाऊन किपर बी़ एन. पठाण, सासवडचे पोलीस उपनिरीक्षक नारायण गिते, पोलीस हवालदार विकास मोहिते, वाहनचालक पोपट शेंडकर, वनपुरीचे महसूल कर्मचारी संतोष कुंभारकर यांनी कारवाई करीत सर्व माल ताब्यात घेतला.
त्या वेळी तेथे घरामध्ये ५० किलोची १३३ पोती, तर ट्रकमध्ये २३० पोती, असा एकूण १८१.५० क्विंटल तांदूळ आढळून आला. तसेच तेथे ५० किलो वजनाची शासकीय धान्याचा शिक्का असलेली सुमारे ४५० पोती आढळून आली. सोमेश्वर साखर कारखान्याची पोती आणून त्यामध्ये तांदूळ भरून ठेवला होता. तो सर्व माल महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतला.
त्यानंतर सासवड येथे उद्योजक बिरजीभाऊ नवलखा यांच्या पीएमटी बसस्थानकजवळील गोदामावर छापा टाकला असता, तेथे ट्रकमध्ये ५० किलो वजनाची सुमारे १०० पोती गहू आढळून आले. त्यापैकी एका पोत्यावर शासकीय धान्याचा शिक्का होता, तर इतर पोत्यांवर खासगी नावे लिहिण्यात आली होती. महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांनी कारवाई करून ट्रक मुद्देमालासह ताब्यात घेतला. त्यानंतर उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

तोपर्यंत माल गायब
ही कारवाई सुरू असतानाच सासवडचे व्यापारी संजय सीताराम उबाळे (वय ४३, रा. धान्यबाजार सासवड) हे तेथे आले व त्याने हा माल बाजारातून घेतल्याचे सांगितले. तसेच मोबाईल फोनवरून इतर सर्व व्यापाऱ्यांना कारवाईची माहिती दिली. तोपर्यंत ठिकठिकाणचा सर्व माल गायब करण्यात आला.

Web Title: Rationing black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.