रसवंती गृहचालकांना मारहाण
By Admin | Updated: March 22, 2017 03:35 IST2017-03-22T03:35:21+5:302017-03-22T03:35:21+5:30
गंज पेठेतील रसवंती गृहचालकाने हप्ता न दिल्याच्या कारणास्तव सराईत गुंडांनी पती-पत्नीला जबर मारहाण केल्याचा प्रकार

रसवंती गृहचालकांना मारहाण
पुणे : गंज पेठेतील रसवंती गृहचालकाने हप्ता न दिल्याच्या कारणास्तव सराईत गुंडांनी पती-पत्नीला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. गंज पेठेतील मासे आळी परिसरात सोमवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
बालाजी उर्फ बबलू रामदास भंडारी (वय ३०), गोविंद सुभाष अजिले (वय २५) व मयूर नरेंद्र कोमपेल्ले (वय २२, रा. सर्व गंज पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या सराइतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे गंज पेठेतील मासे आळीमध्ये कानिफनाथ नावाचे रसवंती गृह आहे. जानेवारी २०१६ पासून येथे रसवंतीगृह चालवतात. आरोपींनी फिर्यादीकडे येथे व्यवसाय करायचा असल्यास महिना दोन हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणत दमदाटी करून वेळोवेळी एकूण ८ हजार रुपये घेतले. दरम्यान, गेल्या काही महिन्यातले पैसे फिर्यादींनी दिले नव्हते. तसेच, यावर्षाचा हप्ताही दिला नव्हता. तो हप्ता मागण्यासाठी आरोपी सोमवारी दुपारी दुकानात आले. पण हप्ता देण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर चिडलेल्या सराईत गुन्हेगारांनी लाकडी बॅटने पती-पत्नीला मारहाण केली. त्यानंतर रात्री खडक पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. दरम्यान, आरोपी बालाजी उर्फ बबलू व गोविंद अजिले हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. तर, आरोपी मयूर याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. (प्रतिनिधी)