जिल्हा विज्ञान प्रदर्शनात रसिका, स्वरूप प्रथम

By Admin | Updated: January 25, 2017 01:31 IST2017-01-25T01:31:30+5:302017-01-25T01:31:30+5:30

जयहिंद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक कुरण येथे पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) पुणेच्या वतीने आयोजित ४२व्या जिल्हा

Rasika, first in appearance of District Science exhibition | जिल्हा विज्ञान प्रदर्शनात रसिका, स्वरूप प्रथम

जिल्हा विज्ञान प्रदर्शनात रसिका, स्वरूप प्रथम

नारायणगाव : जयहिंद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक कुरण येथे पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) पुणेच्या वतीने आयोजित ४२व्या जिल्हा विज्ञान प्रदर्शनामध्ये शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय वढू (ता. शिरूर) येथील कु. रसिका शिवले हिचा प्राथमिक विभागात, तर कु. स्वरूप अतुल खारूळ, महात्मा गांधी विद्यालय सांगवी (पुणे) याचा माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक आला. दरम्यान, या प्रदर्शनाला पुणे जिल्ह्यातील ९० शाळांमधील २५,००० विद्यार्थ्यांनी भेट दिली.
४२वे जिल्हा विज्ञान प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी पहिल्या सत्रात ‘मातृभाषेतून शिक्षण असावे का?’ याबाबत चर्चासत्र पार पडले. ज्यामध्ये प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, प्रा. नॅन्सी हंडा, रवींद्र भोर, राजश्री सदाकाळ, गझाला शेख व सुवर्णा वायकर हे सहभागी झाले होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून शिक्षण जरूर घ्यावे; परंतु आजच्या विज्ञान युगाला सामोरे जाताना आंतरराष्ट्रीय भाषादेखील अवगत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांनी व्यक्त केले.
या प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ तहसीलदार आशा होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जयहिंदचे संस्थापक-अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ यांच्या अध्यक्षेखाली पार पडला. या वेळी उपशिक्षणाधिकारी बी. के. राक्षे, गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ, संचालक एन. एम. काळे, संचालिका शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. गल्हे, प्राचार्य जाधवर, प्राचार्य वाय. एस. गुंजाळ, विस्तार अधिकारी बेंद्रे, आर. एस. शेंगाळ, के. बी. खोडदे, सुनंदा डुंबरे, अनिता शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
विस्तार अधिकारी अशोक लांडे यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब खाडे व सुनीता वामन यांनी सूत्रसंचालन केले. हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ, जयहिंद शैक्षणिक संकुलाचे सर्व कर्मचारी, केंद्रप्रमुख, विषयतज्ज्ञ व तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)

Web Title: Rasika, first in appearance of District Science exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.