राष्ट्रवादी सरदारांना सुभा सांभाळण्यातच रस

By Admin | Updated: February 1, 2017 05:14 IST2017-02-01T05:14:13+5:302017-02-01T05:14:13+5:30

सगळ्या सरदारांना सुभे सांभाळ्यातच रस, निर्णयस्वातंत्र्य नसल्याने कुढतच मान्य केले जाणारे निर्णय आणि बीडीपीसारख्या धोरणात्मक बाबींवरच तीव्र मतभेद यामुळे

Rashtravadi chiefs are interested in maintaining good luck | राष्ट्रवादी सरदारांना सुभा सांभाळण्यातच रस

राष्ट्रवादी सरदारांना सुभा सांभाळण्यातच रस

पुणे : सगळ्या सरदारांना सुभे सांभाळ्यातच रस, निर्णयस्वातंत्र्य नसल्याने कुढतच मान्य केले जाणारे निर्णय आणि बीडीपीसारख्या धोरणात्मक बाबींवरच तीव्र मतभेद यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये उघड गटबाजी दिसत नसली तरी अंतर्गत पातळीवर एकमेकांवर कुरघोड्या होत आहेत. उमेदवारनिवडीमध्ये त्याचे प्रत्यंतर येत आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेस आपली ताकद वाढविण्यासाठी विधीनिषेध बाळगत नाही, असा आरोप कॉँग्रेसकडून नेहमीच केला जातो. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब आणखीच अधोरेखित झाली. संयुक्त चर्चा सुरू असतानाही काँग्रेसच्या नगरसेवकांना प्रवेश देण्याची दादागिरी राष्ट्रवादीतीलच अनेक नगरसेवकांना आवडलेली नाही. अंतर्गत गटबाजीतून पक्षाला धक्का बसेल, या भीतीतून काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा आग्रह खुद्द अजित पवार
यांच्याकडूनच धरला जात होता. मात्र आघाडीची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना पक्षात प्रवेश देण्याची दादागिरी झाली व आघाडीवर पाणी पडले. अजित पवार यांचे वर्तुळ, खासदार सुप्रिया सुळे यांची लॉबी, शरद पवार यांना मानणारे काही ज्येष्ठ व शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्याविरोधात काम करणारा आमदार अनिल भोसले यांचा स्वतंत्र गट राष्ट्रवादीमध्ये काम करीत असतात.
पक्षाच्याच कार्याध्यक्षांच्या घरावर महिला आघाडीने मोर्चा काढण्याचा प्रकार या गटबाजीतूनच झाला. त्याहीपूर्वी तब्बल १० जणांनी शहराध्यक्षांच्याविरोधात उघडपणे आघाडी तयार करून त्यांना बदलण्याची मागणी केली होती. पक्षाच्या महापौरांनी थेट सर्वसाधारण सभेत काँग्रेस नगरसेवकाच्या साह्याने गणपूर्तीची विचारणा करून स्वपक्षाच्या नगरसेवकाचा विषय लांबणीवर टाकण्याचा प्रकार केला होता. त्या नगरसेवकाने राजीनाम्याची धमकी देऊन त्यांच्यावर कुरघोडी केली. विधान परिषद निवडणूक मतदानाच्या वेळी शहराध्यक्षांनी त्याकडे पाठ फिरवण्याची गोष्ट तर अगदी अलीकडची.
ही गटबाजी तीव्र आहे. त्यामुळेच पक्षाच्या प्रचारात कुठेही एकसंधपणा दिसत नाही. १० वर्षांच्या सत्तेतून सुभेदार तयार झाले असून त्यांनी आपापले सुभे तयार केले आहेत. ते सांभाळण्यातच त्यांना रस आहे, अशी तक्रार पक्षाच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांकडून खासगीत केली जात असते. त्यात तथ्यही दिसते.
महापौरपद सांभाळलेल्या व्यक्तीने शहराच्या प्रचारात व्यस्त असावे, अशी अपेक्षा बाळगण्यात येते. राष्ट्रवादीच्या एकाही माजी महापौराने असे केलेले दिसत नाही. शहराध्यक्षांना असलेला विरोध हेच त्याचे कारण असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच त्यांची वेगळी आघाडी व शहराध्यक्षांची वेगळी असे चित्र राष्ट्रवादीमध्ये तयार झाले आहे.
(प्रतिनिधी)

उपनगरांतच जोर : मध्यवर्ती भागात प्रवेश करणे अवघडच
उपनगरांमधील वर्चस्वाच्या जोरात राष्ट्रवादीला शहराच्या मध्यवर्ती भागात प्रवेश करायचा आहे, पण सुभेदारांच्या सहयोगाअभावी ते शक्य होत नाही, अशी पक्षसंघटनेत काम करणाऱ्यांची तक्रार आहे. सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार असलेल्या सुरेश कलमाडी यांचे काम राष्ट्रवादीचे काही नगरसेवक करीत नव्हते. त्यांना थेट शरद पवार यांनी तंबी दिली होती. दादागिरीमध्येही त्यांच्या शब्दाचा दबदबा अजून कायम आहे, मात्र सुभेदारांची तक्रार त्यांच्याकडे करायची कोणी ही संघटनेत काम करणाऱ्यांपुढची समस्या आहे. त्यातून दादा बिघडले तर काय, अशी भीतीही आहे.

महापालिका निवडणुकीसाठी सर्वात आधी जाहीरनामा घोषित झाला तो राष्ट्रवादी काँग्रेसचा, पण त्यालाही अनेक सुभेदार उपस्थित नव्हते. पक्षसंघटनेकडून कार्यकर्ते, इच्छुक यांच्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन केले गेले, त्याकडेही अनेकांनी पाठ फिरवली. आताही सगळे आपापल्या सुभ्यातच प्रचार करण्यात दंग आहेत. भाजपाकडून निवडणुकीच्यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या सत्तेवर अनेक आरोप केले जातात. त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल असा नेताच राष्ट्रवादीत नाही.

सत्तेचा वाटा मुठभरांनाच
पक्षाच्या उपनगरांमधील वर्चस्वामुळे विशिष्ट लोकांचाच पक्ष हा शिक्का राष्ट्रवादीवर बसला आहे. काही जणांना सत्तापद देऊन तो पुसण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यात पक्षाला पुरेसे यश आलेले नाही, असे दिसते. त्यामुळेच सत्तेचा सर्वाधिक वाटा मोजक्याच लोकांना मिळाला, असे बोलले जात आहे.

Web Title: Rashtravadi chiefs are interested in maintaining good luck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.