रायरेश्वर, रोहिडाचाही होणार विकास
By Admin | Updated: March 10, 2017 04:43 IST2017-03-10T04:43:12+5:302017-03-10T04:43:12+5:30
छत्रपती शिवाजीमहाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर किल्ला व रोहिडेश्वर या गडकोट किल्ल्याची पाहणी पर्यटन विभागाकडून करण्यात

रायरेश्वर, रोहिडाचाही होणार विकास
भोर : छत्रपती शिवाजीमहाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर किल्ला व रोहिडेश्वर या गडकोट किल्ल्याची पाहणी पर्यटन विभागाकडून करण्यात आली असून, सदरचा विकास आराखडा तयार करून किल्ल्यांवर पायाभूत सुविधांसह पर्यटनदृष्ट्या विकास होणार आहे.
राजगडच्या विकास आराखडा नुकताच झाला असून आता रायरेश्वर व रोहिडा किल्ल्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास होणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पर्यटनविभागाकडे याबाबत मागणी केली होती. पर्यटनविकास महांडळाच्या विभागीय अधिकारी वैशाली चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज पर्यटन विभागाचे उपअभियंता दीपक हर्णे, शाखा अभियंता रणजित मुळे यांनी रायरेश्वर व रोहिडेश्वर या किल्ल्यांची पाहणी करून रायरी व बाजारवाडी या ग्रामपंचायतींना कागदपत्रे देण्यास सांगितले असून आठवडाभरात आराखडा सादर करण्यात येईल.
रायरेश्वर किल्ल्याकडे जाणारा रस्ता, डोंगराला असणारी लोखंडी शिडी दोन्ही बाजूंना कठडे व रेलिंग पायऱ्यांची दुरुस्ती करणे, स्ट्रीट लाईटचे काम, सौर पथदिवे लावणे, कट्टे तयार करणे, शिवकालीन मंदिराची दुरुस्ती करणे, वाहनतळ, शौचालये, नळ पाणीपुरवठा योजना व विश्रामगृहाची सुविधा करण्यात येणार आहे.
तर, रोहिडा किल्ल्याकडे जाणारी वाट, रेलिंग संरक्षक कठडे, पायथ्याजवळ वाहनतळ, शौचालये व विश्रामगृह, सौर पथदिवे ही कामे करण्यात येणार आहेत. (वार्ताहर)