पुणे : अतिशय दुर्मिळ आणि प्रदेशनिष्ठ ग्लोबा अंडरसोनी ही वनस्पती सिक्किम येथील पर्वतरांगांमध्ये आढळून आली आहे. तिला डान्सिंग लेडीज किंवा स्वॉन फ्लॉवर्स म्हटले जाते. तिचा आकार हंसासारखा दिसतो. ही वनस्पती जगात फक्त सिक्किममध्ये असून, यापूर्वी १३६ वर्षांपूर्वी आढळून आली होती. वनस्पती अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर यांचा या कामात सहभाग आहे. अतिधोकाग्रस्त वनस्पतीमध्ये हिचा समावेश झालेला आहे. झिंगीबेरासी म्हणजेच आद्रक, हळद या कुटुंबातील ती वनस्पती आहे. या संदर्भातील लेख ‘बॉटनी लेटर्स’ या जागतिक पत्रिकेत नुकताच प्रसिध्द झाला आहे. जयकृष्णन थाचट, वडाखूट शंकरन हरिश आणि ममियिल साबू आणि सचिन पुणेकर यांनी यावर संशोधन केले आहे. सिक्किम आणि दार्जालिंग पर्वतरांगातच ही वनस्पती दिसून येते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून ती गायब झाली होती. यापूर्वी स्कॉटिस बॉटनिस्ट थॉमस अॅँडरसन यांनी १८६२ मध्ये संकलन केले होते. त्यानंतर १८७५ मध्ये ब्रिटिश बॉटनिस्ट सर जॉर्ज किंग यांना आढळून आली होती. अतिशय घनदाट जंगल आणि खडकावर तिचा अधिवास आहे. गेल्या काही वर्षांपासून सिक्किम येथील पर्वतरांगामध्ये रस्तारुंदीकरणात ही वनस्पती नष्ट होत आहे. ===============
दुर्मीळ असणारी 'हंस' फुले आढळली, सुमारे १३६ वर्षांनंतर दिसल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 18:45 IST