’पाकिजा’ निर्मितीचे दुर्मीळ चित्रीकरण ‘एनएफएआय’च्या खजिन्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST2021-04-01T04:12:40+5:302021-04-01T04:12:40+5:30

पुणे : मोगल बादशाह शाहजहानने बेगम मुमताजसाठी प्रेमाचे प्रतीक असलेला ‘ताजमहाल’ बांधला. प्रसिद्ध दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याही ...

Rare filming of 'Pakija' production in NFAI's treasury | ’पाकिजा’ निर्मितीचे दुर्मीळ चित्रीकरण ‘एनएफएआय’च्या खजिन्यात

’पाकिजा’ निर्मितीचे दुर्मीळ चित्रीकरण ‘एनएफएआय’च्या खजिन्यात

पुणे : मोगल बादशाह शाहजहानने बेगम मुमताजसाठी प्रेमाचे प्रतीक असलेला ‘ताजमहाल’ बांधला. प्रसिद्ध दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याही मनात आले की आपल्या बेगमसाठी म्हणजे अभिनेत्री मीनाकुमारी यांच्यासाठी देखील असाच एक भव्य चित्रपट निर्मित करावा आणि त्यांनी निर्माण केली भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अजरामर ठरलेली कलाकृती ‘पाकिजा’. अमरोही यांचे ‘कमाल’ दिग्दर्शन, मीनाकुमारी यांचे सौंदर्य, राजकुमार यांचे अभिनय सामर्थ्य, शायर कैफी आझमी, मजरूह सुल्तानपुरी आणि कैफ भोपाली यांची गीते....त्या शब्दांना गुलाम मोहम्मद साहब आणि नौशाद अली यांनी दिलेला संगीताचा साज...हा चित्रपट आजही रसिकांच्या मनात रूंजी घालतो.

बुधवार (दि. ३१) मीनाकुमारी यांच्या ४९ व्या स्मृतिदिनी ‘पाकिजा’ चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया उलगडणारे ‘पाकिजा : रंग बरंग’ या शीर्षकाअंतर्गत सोळा एमएममधील अठरा मिनिटांचे दुर्मीळ चित्रीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे (एनएफएआय) आले आहे. एका चित्रपट वितरकाने हे फुटेज संग्रहालयाला दिल्याचे सांगण्यात आले. ‘इन्ही लोंगो ने’ या कृष्णधवल स्वरूपातील गाण्याच्या चित्रीकरणाने १६ जुलै १९५६ रोजी ‘पाकिजा’चा मुहूर्त करण्यात आला होता. या चित्रीकरणाच्या क्लॅपर बोर्डवरही या तारखेचा उल्लेख आहे. मीनाकुमारीचे आजारपण व अन्य कारणांमुळे पाकिजाची निर्मिती पंधरा वर्षे रेंगाळली होती. प्रत्यक्षात हा चित्रपट पूर्ण होऊन तो प्रदर्शित होण्यास १९७२ साल उजाडले! या दुर्मीळ फुटेजमध्ये मोहम्मद रफी यांच्या स्वरातील ’जाऐ तो जाऐ कहा, अब ये तेरा दिवाना’ या कव्वालीची दृश्ये देखील आहेत.

त्याचबरोबर मुंबई मराठा मंदिर चित्रपटगृहात झालेल्या ‘पाकिजा’च्या प्रदर्शनी ‘शो’ची काही दृश्ये त्यात आहेत. संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले की प्राप्त चित्रीकरण प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यापूर्वी त्यावर संस्कार करणे आवश्यक आहे.

Web Title: Rare filming of 'Pakija' production in NFAI's treasury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.