शब्दसुरांच्या मैफिलीत रमले रसिक

By Admin | Updated: January 23, 2015 00:22 IST2015-01-23T00:22:02+5:302015-01-23T00:22:02+5:30

नट नाट्य अवघे संपादिले सोंग, भेद जाऊ रंग ना पालटे, मांडियला खेळ कौतुक बहुरूप, आपले स्वरूप जाणतो..

Ramsay Rasik in the concert of vocabulary | शब्दसुरांच्या मैफिलीत रमले रसिक

शब्दसुरांच्या मैफिलीत रमले रसिक

पुणे : ‘नट नाट्य अवघे संपादिले सोंग, भेद जाऊ रंग ना पालटे, मांडियला खेळ कौतुक बहुरूप, आपले स्वरूप जाणतो... या संत तुकाराम महाराजांच्या काव्यसंपदेतून शब्दसुमनांची उधळण करणारे साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि ‘लागी करजवा कट्यार’ या हृदयाचा ठाव घेणाऱ्या स्वरांची बरसात करणाऱ्या नाट्यसंमेलनाध्यक्ष फय्याज. अशा साहित्य व नाट्य क्षेत्रातील दोन विभूतींच्या एकत्रित ‘शब्दसुरां’च्या अनोख्या मैफिलीचा अनुभव रसिकांनी घेतला आणि ही मैफिल कधी संपूच नये, या तल्लीनतेमध्येच रसिकवर्ग हरवला.
निमित्त होते संवाद पुणे आयोजित साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि नाट्यसंमेलनाध्यक्ष फय्याज यांच्या एकत्रित सत्कार सोहळ्याचे. संमेलनाच्या इतिहासात दोन्ही संमेलनाध्यक्ष एकाच व्यासपीठावर येण्याचा दुर्मिळ योग काल जुळून आला.
खरे तर साहित्य आणि नाट्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू. अनेक थोर साहित्यिक नाटककारही असल्याने, दोन्ही संमेलनाध्यक्षांनी एकमेकांना बेळगाव आणि घुमानला येण्याचे अधिकृत निमंत्रण देत आपल्या मोठेपणाचेही दर्शन या वेळी उपस्थितांना घडविले.
नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. मोरे यांचा सत्कार संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते तुकाराममहाराजांची पगडी, चिपळ्या, तुळशीची माळ आणि फुलांची कुंडी देऊन, तर फय्याज यांना डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते साडी देऊन गौरविण्यात आले. घुमान साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, संवादचे सुनील महाजन आणि निकिता मोघे उपस्थित होते.
डॉ. मोरे यांनी प्रारंभीच ‘करू आवडीने वाद’ असे संबोधन करीत संमेलनात वाद झाला, तरी गैर काहीच नाही; पण त्या वादात संवाद व्हावा, मराठी माणसांमध्ये जी क्षमता आहे त्याला उजाळा देण्याचे काम व्हावे, अशी अपेक्षा साहित्य संमेलनाकडून व्यक्त केली. रागांमध्ये ज्याप्रमाणे दोन घराण्यांचा संबंध असतो, तसाच काहीसा प्रकार ‘लोकमान्य ते महात्मा’ पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न मी केला. बदल, संघर्ष मांडताना सुंदर नाट्यानुभावाचीच अनुभूती वाचकांना मिळते. खरे तर यावर नाटकच लिहायचे होते, पण ते शक्य झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, साहित्य संमेलनात पूर्वी नाट्यप्रयोग व्हायचे; मात्र नाट्य संमेलनातील साहित्यिकांच्या सहभागाबद्दल कल्पना नसल्याचे ते म्हणाले. फय्याज यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकातील भैरवी आणि ‘तो मी नव्हेच’मधील लखोबा लोखंडेच्या कानडी पत्नीच्या मुखातील संवादात्मक अभिनयाच्या सादरीकरणातून दाद मिळविली.

४संगीत नाटकांची अवस्था खूप बिकट आहे. संगीत नाटकांसाठी संहिता नाहीत. यातच आजचे निर्माते संगीत नाटक करायला धजावत नाहीत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत गद्य नाटकांबरोबरच सांगीतिका करण्यास हरकत नाही. गाणं आले म्हणजे संगीत रंगभूमीवर काम करणे सोपे आहे. समाजातील घडामोडी, स्त्रीमनाचे क्रंदन त्यावर सांगीतिका करता येणे शक्य आहे. मात्र, ते शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून न जाता लोकसंगीतातून जावे, याकडे नाट्य संमेलनाध्यक्षा फय्याज यांनी लक्ष वेधले; तसेच गाणं म्हणजे संगीत नाटक नव्हे, याचे तरुणाईला भान देण्यासाठी रंगभूमीविषयी कार्यशाळा घेतल्या जाव्यात, असेही त्या म्हणाल्या.

४अनेक थोर साहित्यिक नाटककार होऊन गेले आहेत, असे सांगून आचार्य अत्रे आणि प्रभाकर पणशीकर यांच्यातील वादाच्या ठिणगीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. नाट्यसंमेलनामध्ये साहित्यिक का येत नाही ? हे मला माहीत नाही; पण मी मात्र घुमान साहित्य संमेलनाला जाणार असून, तिथे जाऊन संत नामदेवांचे अभंग गाणार आहे. तुम्हीदेखील बेळगावच्या
नाट्यसंमेलनाला यावे, असे निमंत्रणच फय्याज यांनी डॉ. सदानंद मोरे यांना दिले. विनया आपटे आणि सुनील महाजन यांनी दोघांशी संवाद साधला. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. निकिता मोघे यांनी आभार मानले.

Web Title: Ramsay Rasik in the concert of vocabulary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.