शिक्रापूर सरपंचपदी बांदल गटाचे रमेश गडदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:16 AM2021-02-26T04:16:50+5:302021-02-26T04:16:50+5:30

शिक्रापूर (ता. शिरूर) या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत मंगलदास बांदल गटाचा पराभव झाला होता. मात्र, सरपंच पदाचे आरक्षित ...

Ramesh Gadde of Bandal group as Shikrapur Sarpanch | शिक्रापूर सरपंचपदी बांदल गटाचे रमेश गडदे

शिक्रापूर सरपंचपदी बांदल गटाचे रमेश गडदे

googlenewsNext

शिक्रापूर (ता. शिरूर) या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत मंगलदास बांदल गटाचा पराभव झाला होता. मात्र, सरपंच पदाचे आरक्षित उमेदवार बांदल गटाकडे होते, त्यांनतर आरक्षणाबाबत आक्षेप घेतला गेल्याने सरपंच-उपसरपंच पदाची निवडणूक महिनाभर लांबली गेली. सर्व घडामोडीनंतर गुरुवारी सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. सरपंचपदी बांदल गटाचे रमेश गडदे बिनविरोध निवड झाली असून उपसरपंच पदाच्या निवडणुकीत उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे सुभाष खैरे हे नऊ मते मिळवीत एका मताने विजयी झाले आहे.

शिक्रापूर, ता. शिरूर येथे ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना एक जागा बिनविरोध झाली आणि सोळा जागेसाठी झालेल्या निवडणुकीत मंगलदास बांदल गटाला सात जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादीच्या बापूसाहेब जकाते, आबासाहेब करंजे, आबाराजे मांढरे, अरुण करंजे बाबासाहेब सासवडे, सोमनाथ भुजबळ यांच्या गटाला नऊ जागा मिळाल्या होत्या. मंगलदास बांदल गटाचा पराभव झाला होता. मात्र त्यांनतर आरक्षण जाहीर होऊन सरपंचपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले. या जागेसाठी मंगलदास बांदल गटाकडेच एकमेव सदस्य असल्याने विरोधी गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यामुळे शिरूर तालुक्यातील तब्बल ७१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया लांबणीवर गेली. त्यांनतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने निवडणूक पार पडत असताना आज झालेल्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुकी दरम्यान मयूर करंजे, वंदना भुजबळ, सारिका सासवडे, मोहिनी युवराज मांढरे, कृष्णा सासवडे, शालन राऊत, त्रिनयन कळमकर, पूजा भुजबळ, प्रकाश वाबळे, कविता टेमगिरे, उषा राऊत, विशाल खरपुडे, रमेश थोरात, सिमा लांडे, रमेश गडदे, सुभाष खैरे, मोहिनी संतोष मांढरे हे उपस्थित होते. यावेळी सरपंच पदाचे एकमेव दावेदार असलेले रमेश थोरात यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला. उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादीचे सुभाष बबन खैरे व मंगलदास बांदल गटाच्या शालन अनिल राऊत व मोहिनी युवराज मांढरे यांनी अर्ज दाखल केला. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या वेळेत शालन राऊत यांनी अर्ज मागे घेतला. उपसरपंच पदासाठी मोहिनी मांढरे व सुभाष खैरे यांच्यात निवडणूक झाली, यावेळी सुभाष खैरे यांना नऊ तर मोहिनी मांढरे यांना आठ मते मिळाली.

निवडणूक निर्णय अधिकारी उद्धव ढापसे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे यांनी जाहीर केले. मात्र यावेळी सरपंच एका गटाचा व उपसरपंच एका गटाचा झाल्याने दोन्ही गटांनी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराचे दर्शन घेऊन घरचा रस्ता धरला, मात्र यावेळी कोणतीही घोषणाबाजी अथवा भाषण झाले नाही आणि निवडणूक कार्यक्रम शांततेत पार पडला. यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण व पोलीस हवालदार दत्तात्रय होले यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.

Web Title: Ramesh Gadde of Bandal group as Shikrapur Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.