निवडणूक कर्मचाऱ्यांची खानपान सुविधा रामभरोसे

By Admin | Updated: February 13, 2017 02:25 IST2017-02-13T02:25:41+5:302017-02-13T02:25:41+5:30

निवडणूक यंत्रणेत प्रत्यक्ष काम करणाऱ्या मतदान अधिकारी, केंद्र अध्यक्ष, शिपाई, पोलीस अशा कर्मचाऱ्यांना ...

Ram Bharosi, the catering service for the employees | निवडणूक कर्मचाऱ्यांची खानपान सुविधा रामभरोसे

निवडणूक कर्मचाऱ्यांची खानपान सुविधा रामभरोसे

पुणे : निवडणूक यंत्रणेत प्रत्यक्ष काम करणाऱ्या मतदान अधिकारी, केंद्र अध्यक्ष, शिपाई, पोलीस अशा कर्मचाऱ्यांना ज्या केंद्रांवर, अर्थात खासगी, पालिका शाळांमध्ये राहण्याची, स्वच्छतागृहाची, आंघोळीसाठीची काय व्यवस्था आहे, या बाबतचे सर्वेक्षण महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयाने केलेले नाही. त्यामुळे या सुविधांबाबत रामभरोसे राहण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे.
पुणे शहरातील विविध प्रभागांमध्ये मतदानासाठी महानगरपालिका, खासगी संस्थांच्या शाळांचा केंद्र म्हणून वापर होतो. सुमारे ३,४३२ मतदान केंद्रे आणि २० हजार कर्मचारी २१ फेब्रुवारीच्या मतदानासाठी काम करणार आहेत. एका केंद्रामध्ये साधारणत: ६ जणांचे मनुष्यबळ नियुक्त केले जाईल. केंद्रप्रमुख, ३ मतदान अधिकारी, एक शिपाई आणि एक पोलीस कर्मचारी यांचा त्यात समावेश असेल.
मतदानकेंद्र म्हणून वापरात आणल्या जाणाऱ्या या शाळांमध्ये, विशेषत: महानगरपालिकेच्या शाळांमध्ये स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय वाईट असते. अनेक खासगी शाळांमधील स्वच्छतागृहांची अशीच अवस्था असते. मध्यंतरी ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात स्वच्छतागृहे गलिच्छ असल्याने मुली त्याचा वापरच करीत नसल्याचे आणि नैसर्गिक विधी होऊच नयेत, यासाठी पाणी पित नसल्याचे दिसून आले होते.
अशा स्थितीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्र ताब्यात आल्याने मुक्काम केंद्राच्या ठिकाणीच करावा, अशा सूचना निवडणूक कार्यालयाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण ३० ते ४० टक्के असणार आहे. २० तारखेच्या सकाळीच सर्व कर्मचाऱ्यांना मुख्य निवडणूक कार्यालयात हजर व्हावे लागेल. दिवसभर कोणत्या केंद्रासाठी किती यंत्रे, कोणते कर्मचारी यांची व्यवस्था केल्यानंतर कर्मचाऱ्यांना बसने केंद्रांवर पोचविले जाईल. यंत्र ताब्यात असल्याने या कर्मचाऱ्यांना केंद्र सोडून जाता येणार नाही. यंदा निवडणूक कर्मचाऱ्यांना त्यांचा भत्ता आॅनलाईन पद्धतीने दिला जाणार आहे. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले असले तरी ते प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना अडचणीचे झाले आहे. त्यातच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्याहारी, चहा, पाणी, जेवण यांची व्यवस्था त्यांची त्यांनीच करावी असे सूचित केले आहे. तसेच आदल्या दिवशी झोपण्याची व्यवस्थाही करावी, असे सांगितले आहे. अनेक शिक्षकांचे ३ महिन्यांपासून वेतन झालेले नाही. पैशांची चणचण असल्याने दोन दिवसांचा खर्च कसा भरून काढायचा, असा प्रश्न अनेकांपुढे आहे.
जेवण, चहा, आदी सुविधांबाबत आमची फारशी तक्रार नाही, मात्र शाळांमध्ये बाथरूमची व्यवस्था नसल्याने आंघोळीबाबत प्रश्न येऊ शकेल. त्याबाबत एका उपायुक्तांनी घेतलेल्या कार्यशाळेच्या वेळी काही शिक्षकांनी प्रश्न उपस्थित केले, मात्र त्यांचे पूर्ण समाधान झाले नाही.

Web Title: Ram Bharosi, the catering service for the employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.