राजगुरुनगर-मंचर महामार्ग नव्हे, मंदमार्ग
By Admin | Updated: July 10, 2015 01:12 IST2015-07-10T01:12:13+5:302015-07-10T01:12:13+5:30
पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर राजगुरुनगर ते मंचरदरम्यान वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे महामार्ग चर्चेत आला आहे.

राजगुरुनगर-मंचर महामार्ग नव्हे, मंदमार्ग
पेठ : पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर राजगुरुनगर ते मंचरदरम्यान वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे महामार्ग चर्चेत आला आहे. या मार्गावर होणारे अपघात व वाहतूककोंडी यांमुळे वाहतूक मंदावत आहे. चौपदरीकरणाचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालक व प्रवासी करीत आहेत.
वाहतूक खात्याचे दुर्लक्ष व वाहतुकीच्या नियमांचे पालन न करण्याची वाहनचालकांची प्रवृत्ती यांमुळे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या वाढतच चालली आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या वाढतच आहे. या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या किंवा गंभीर जखमी होणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचे लक्षात येते.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वेगाने वाढणाऱ्या चार ते पाच वर्षांच्या तुलनेत सध्या वाहनांची संख्या ही वाढतच आहे. या महामार्गावर वेगाने वाढणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीला मर्यादा पडत आहेत. त्यातच अवजड वाहनांचे प्रमाणदेखील प्रचंड वाढले आहे. त्यामुळे या घाटात वारंवार अपघात होतात. या दोन्ही घाटांतील रस्ता हा अरुंद असून वळणे नागमोडी आहेत. त्यामुळे सध्या पडलेले खड्डे चुकवण्याच्या नादात या ठिकाणी अपघात होतात. खेड घाटात तर दरड कोसळण्यासारखे प्रकारदेखील घडत आहेत.
पुणे ते आळेफाट्यादरम्यान औद्योगिक क्षेत्राचा विस्तार प्रचंड वेगाने होत आहे. पुणे ते नाशिक रेल्वेमार्ग झाल्यास रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. परंतु, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. (वार्ताहर)
> लग्नसराईच्या हंगामात राजगुरुनगर व मंचर येथे वाहतुकीच्या खोळंबा होतो. अवजड वाहने व कंटेनर यांना दिवसा या महामार्गावरून ये-जा करण्यास बंदी घालावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. काही दिवसांपासून या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा या ठिकाणी रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे काढण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाने सपाटाच लावला आहे. लवकरात लवकर या महामार्गाचे संपूर्ण चौपदरीकरण झाल्यानंतर अपघातांच्या संख्येत निश्चितच घट होईल व अपघातांमध्ये जाणारे जीव वाचतील व नागरिक-प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल.