राजगुरुनगर अखेर नगर परिषद
By Admin | Updated: August 15, 2014 01:07 IST2014-08-15T01:07:39+5:302014-08-15T01:07:39+5:30
स्वातंत्र्यदिनी राजगुरुनगरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसांपासून शासनदरबारी प्रलंबित असलेल्या नगर परिषद प्रस्तावावर सरकारने शिक्कामार्तेब केले आहे.

राजगुरुनगर अखेर नगर परिषद
राजगुरुनगर : स्वातंत्र्यदिनी राजगुरुनगरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसांपासून शासनदरबारी प्रलंबित असलेल्या नगर परिषद प्रस्तावावर सरकारने शिक्कामार्तेब केले आहे. नगरविकास विभागाचे उपसचिव ज. ना. पाटील यांनी अखेर ‘क’ दर्जाची नगर परिषदेचे आदेश आज काढले.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही बातमी समजल्याने राजगुरुनगरवासीयांनी आनंद व्यक्त केला. ‘लोकमत’ने या नगर परिषदेच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाल्याची बातमी सर्वप्रथम २४ जुलैच्या अंकात दिली होती.
शासन उद्घोषणा नगरविकास विभाग एनयुपी-२०१२/प्र. क्र. ६५ पुनर्बांधणी २१ नवीन १९(२) नुसार राजगुरुनगर नगर परिषद गठीत झाल्याचा आदेश नगरविकास उपसचिव ज. ना. पाटील यांनी दिला. त्यानुसार राजगुरुनगरचे सर्व्हे क्र. १ ते ३२९ हे क्षेत्र या नगर परिषदमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये काही सर्व्हे नंबर तिन्हेवाडी, सातकरस्थळ, राक्षेवाडी या ग्रामपंचायातीमधील आहेत.
गेली अनेक दिवस शासनदरबारी राजगुरुनगर येथे नगरपालिका व्हावी, यासाठीचा प्रस्ताव प्रलंबित होता. त्यासाठी राजकीय स्तरावर खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील आग्रही होते. नीलेश कड पाटील ही या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करीत होते. मध्यंतरीच्या काळात शासनाने राज्यातील ग्रामपंचायती असलेल्या सर्व तालुक्यांच्या गावी नगरपालिका करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रशासकीय स्तरावर प्रक्रिया सुरू आहे.
राजगुरुनगर नगर परिषद होण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया आधीच पूर्ण झालेल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषद करणे योग्य असल्याचा अभिप्राय दिला होता. त्यामुळे राजगुरुनगरचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात होता. सर्व निकष राजगुरुनगरने पूर्ण केलेले होते. नवीन शासन निर्णयामुळे त्याला अजून बळ मिळाले. त्यामुळे शासनाने राजगुरुनगर येथे नगर परिषद स्थापनेस मान्यता दिली व आज आदेश काढला.
या निर्णयामुळे शासनाने राज्यातील ज्या १३८ तालुक्यांच्या गावी नगरपालिका करण्याचा निर्णय घेतला होता, त्यात राजगुरुनगरचा प्रथम क्रमांक लागला.(वार्ताहर)