राजगौरीची बुद्धीमत्ता भल्याभल्यांना थक्क करणारी
By Admin | Updated: May 10, 2017 03:09 IST2017-05-10T03:09:08+5:302017-05-10T03:09:08+5:30
मी १२ वर्षाच्या राजगौरीला परीक्षा हॉलमध्ये सोडण्यासाठी गेलो, तेव्हा १८ वर्षांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकजण परीक्षेला होते.

राजगौरीची बुद्धीमत्ता भल्याभल्यांना थक्क करणारी
महेंद्र कांबळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : मी १२ वर्षाच्या राजगौरीला परीक्षा हॉलमध्ये सोडण्यासाठी गेलो, तेव्हा १८ वर्षांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकजण परीक्षेला होते. अनेकांना मीच परीक्षार्थी आहे, असे वाटले. ज्या वेळी राजगौरी परीक्षा देणार आहे, असे समजले,तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. निकाल आला, त्या वेळी १६२ अंक तिला मिळाले. बुद्ध्यांक चाचणीत जागतिक स्तरावर तिने नाव मिळवले. कष्ट करण्याची तिची तयारी भल्याभल्यांना लाजवेल अशी आहे, अशा शब्दांत आइनस्टाइनपेक्षा जिचा बुद्धयांक (आय.क्यू) जास्त आहे, अशा जागतिक कीर्तीच्या राजगौरीचे वडील डॉ. सुरजकुमार पवार यांनी सांगितले.
पवार यांनी इंग्लडहून खास ‘लोकमत’शी संवाद साधला. इंग्लंडला जाण्यापूर्वी पवार कुटुंब बारामतीमध्ये वास्तव्यास होते. २००६ मध्ये डॉक्टरेट (पीएच.डी) साठी इंग्लडला जाण्याची त्यांना संधी मिळाली. युनिव्हर्सिटी आॅफ मॅन्चेस्टरमध्ये पीएच.डी होताच तिथे संशोधक म्हणून काम मिळाल्याने ते इंग्लंडमध्येच स्थायिक झाले. दरम्यानच्या काळात बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान बाल विकास मंदिर शाळेत राजगौरीला एक वर्ष शिक्षण घेण्यास मिळाले. त्यानंतर इंग्लंडमधील प्रसिद्ध ‘आॅल्टिंगम ग्रामर स्कूल’मध्ये तिला प्रवेश मिळाला. तिच्यामध्ये दैनंदिन वाचनाची व अभ्यासाची सवय असल्याने आयक्यू टेस्ट देण्याचा निर्णय तिच्या आईवडिलांनी घेतला. साधारणत: १२० ते १४० अंक मिळविणाऱ्यांना ‘जिनिअस’ म्हणून संबोधले जाते. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन, प्रा. स्टिफन हॉकिंग यांना बुद्ध्यांकाचे १६० अंक आहेत. मात्र, राजगौरीने कमाल १६२ अंक मिळविले. या यशाबद्दल ‘मेन्सा’ या प्रतिष्ठित ‘हाय आय क्यू’ सोसायटीचे सदस्यत्वही तिला मिळाले आहे.