नियोजन सेल उभारावा

By Admin | Updated: April 4, 2016 01:36 IST2016-04-04T01:36:21+5:302016-04-04T01:36:21+5:30

महापालिकेच्या विविध विभागांकडून केल्या जाणाऱ्या रस्तेखोदाईच्या कामांमध्ये सुसूत्रता व समन्वय निर्माण व्हावा, भविष्यात कामांचे नियोजन होऊन सतत होणारी खोदाईची कामे थांबावीत

Raising the planning cell | नियोजन सेल उभारावा

नियोजन सेल उभारावा

पुणे : महापालिकेच्या विविध विभागांकडून केल्या जाणाऱ्या रस्तेखोदाईच्या कामांमध्ये सुसूत्रता व समन्वय निर्माण व्हावा, भविष्यात कामांचे नियोजन होऊन सतत होणारी खोदाईची कामे थांबावीत, याकरिता महापालिकेमध्ये ‘नियोजन सेल’ नावाचा स्वतंत्र विभाग स्थापन केला जावा, असा प्रस्ताव प्रशासनाकडून मांडला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे सहआयुक्त सुरेश जगताप यांनी रविवारी दिली.
सजग नागरिक मंचच्या वतीने
‘रस्तेखोदाई’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत, अ‍ॅड. प्रभाकर परळीकर, विवेक वेलणकर, जुगल राठी उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने शहरामध्ये चांगले डांबरी रस्ते उखडून सिमेंटचे रस्ते बांधणे, केबल टाकणे यासाठी सुरू असलेल्या खोदाईच्या कामांवर नागरिकांच्या वतीने प्रश्नांचा भडीमार करण्यात आला.
त्याला उत्तर देताना सुरेश जगताप यांनी सांगितले, ‘शहरामध्ये खोदाईची कामे करणाऱ्या मोबाईल कंपन्या, महावितरण, बीएसएनएल, गॅस कंपन्या यांच्याकडून पुढील ५ वर्षांत खोदाईची काय कामे केली जाणार आहेत, याची माहिती महापालिकेकडून मागविण्यात येते. मात्र, त्याला कंपन्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ज्या कंपन्या यापुढे त्याची माहिती देणार नाही, त्यांना परवानगी दिली जाणार नाही. राडारोडा टाकण्याची सोय वाघोली येथे केली जाणार आहे.’
राजेंद्र राऊत यांनी सांगितले, ‘सिमेंट रस्ता व डांबरी रस्ता यांच्याकरिता सारखाच खर्च येतो. सिमेंट रस्ते जास्त काळ टिकतात. खोदाईची कामे करता यावीत, याकरिता या रस्त्यांमध्ये इंटर लॉकिंग बॉक्स टाकण्यात आले आहेत. खोदाईची कामे सुरू असताना त्याबाबची सर्व माहिती देणारा फलक कामाच्या ठिकाणी लावला जाईल.’
विवेक वेलणकर म्हणाले, ‘रस्त्यांच्या खोदाईमुळे शहरात मोठी वाहतूककोंडी होत आहे. पालिकेच्या विभागात समन्वय दिसून
येत नाही. सिमेंट रस्त्यांची कामे ६ महिने थांबली म्हणून फरक पडत नाही. रेलिंग टाकले जात नाही. बोर्ड लावले जात नाहीत. लोकांचा पैसा पाण्यात चाललाय. सिग्नलला स्पीडब्रेकर टाकले आहेत.’
खोदाईच्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा जुगल राठी यांनी व्यक्त केली. रवी सहाणे, विश्वास सहस्रबुद्धे, संतोष पाटील, अशोक सागर, श्रीप्रसाद बावडे, नीलिमा रानडे, सुधाकर जोशी, सुप्रिया चव्हाण, अशोक रानडे यांनी प्रश्न मांडले. नगरसेवक त्याला वाटेल त्या पद्धतीने त्याचा वॉर्डनिधी खर्च करण्यासाठी अनावश्यक कामे करतो. त्यामुळे सिमेंट रस्ता व इतर विकासकामे करण्यापूर्वी नागरिकांची सहमती बंधनकारक करण्यात यावी. त्याचबरोबर काम चांगले झाले आहे, असा अभिप्राय नागरिकांनी दिल्यानंतर ठेकेदाराला पैसे दिले जावेत, अशी सूचना पुष्कर तुळजापूरकर यांनी केली.

Web Title: Raising the planning cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.