पावसाची दडी! फक्त ३0 टक्केच पेरण्या

By Admin | Updated: July 1, 2015 23:40 IST2015-07-01T23:40:03+5:302015-07-01T23:40:03+5:30

मागील पाच-सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून कडक ऊन पडत आहे. खरीप हंगाम तसेच नगदी पिकांसाठी पावसाची नितांत आवश्यकता आहे.

Rainbow! Only 30 percent sown | पावसाची दडी! फक्त ३0 टक्केच पेरण्या

पावसाची दडी! फक्त ३0 टक्केच पेरण्या

पुणे : मागील पाच-सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून कडक ऊन पडत आहे. खरीप हंगाम तसेच नगदी पिकांसाठी पावसाची नितांत आवश्यकता आहे. पाऊस येत नसल्याने शेतकरी धास्तावला आहे. मात्र, अजून दुबार पेरणीची परिस्थिती नसून जिल्ह्यात ३0 टक्के पेरण्या झाल्याचे जिल्हा कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जिल्ह्यात २ लाख २९८ लाख हेक्टरवर खरीप हंगामाचे कृषी विभागाचे नियोजन आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात भात, बाजरी, भुईमूग, नाचणी, मका, सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात.
यात भाताचे ६२ हजार ३00 हेक्टर क्षेत्र असून, १00 टक्के क्षेत्रावर रोपवाटिका शेतकऱ्यांना टाकल्या आहेत. त्याची रोपेही वर आली असून पावसाची गरज आहे. बाजरीचे ७४ हजार १00 हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत २0 हजार हेक्टरवर म्हणजे साधारण ३५ टक्के पेरणी झाली आहे. भुईमुगाचे ३८ हजार ३00 हेक्टर क्षेत्र असून १२ हजार २00 हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याचे ७ हजार ४00 हेक्टर क्षेत्र असून ७ हजार ३00 हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनचे २ हजार ७00 तसेच नाचणीचे १0 हजार ८00 हेक्टर क्षेत्र आहे. नाचणीच्याही रोपवाटिका शेतकऱ्यांनी टाकल्या आहेत. साधारण जिल्ह्यात ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ३0 टक्के पेरणी झाली आहे.
जिल्हा कृषी अधिकारी काटकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की सध्या पाऊस थांबल्याने पेरणीही थांबली आहे. मात्र शेतकऱ्यांनी घाबरून जाता कामा नये. तशी जिल्ह्यात आज चांगली परिस्थिती आहे. अजून जमिनीत ओल आहे. दुबार पेरणीची अजून शक्यता नाही. जर आठवडाभर पावसाने दडी मारली तर परिस्थिती थोडी चिंताजनक होऊ शकते. मात्र कृषी विभागाकडे आपत्कालीन आराखडा तयार आहे.

मशागत झाली...पाऊस कुठे आहे ?
मंचर : शेतकऱ्यांनी मशागतीची कामे हाती घेतली. खरिपाच्या पेरण्या काही ठिकाणी मार्गी लागल्या. पावसाच्या आगमनाने शेतकरी काहीसा खूश झाला होता. मात्र, हा आनंद अल्पकाळ टिकला आहे. गेली आठ दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. कडक ऊन पडत आहे. अक्षरश: उन्हाळा असल्यासारखे वाटते. आकाशात ढग दिसत नाहीत. खरीप हंगामात पेरणी झालेली पिकांची उगवण होत असतानाच पावसाने ताण दिला आहे. आंबेगाव तालुक्याच्या बहुतेक
सर्वच भागांत पाऊस पडत नाही. त्यामुळे पाणीसाठ्यांमध्ये वाढ होत नाही.

पावसाळ्यातही टँकरची गरज
मोरगाव : बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील शेतकरी खरिपाच्या पेरणीनंतर अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पश्चिम भागातील मोरगाव,तरडोली, आंबी, मुर्टी, जोगवडी, मोढवे, माळवाडी, लोणी भापकर, मासाळवाडी या सर्वच गावांत शेतकऱ्यांनी खरिपातील बाजरी, कांदा, मूग, मटकी आदी पिकांची पेरणी केली. जमिनीत ओलावा असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनीपावसाच्या आशेवर पेरण्या केल्या आहेत. भर पावसाळ्यात काही गावांना टँकरने पाणी पिण्याची वेळ आलेली आहे. कऱ्हा नदीसह ओढे-नाले,तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत.

आर्द्रा नक्षत्र कोरडेच
ओतूर : ओतूर परिसरात मृग नक्षत्र ज्या दिवसी संपले त्या दिवशी सरत्या मृग नक्षत्राचा चांगला पाऊस झाला. त्यानंतर आर्द्रा नक्षत्र २२ जूनला सुरू झाले; परंतु हे नक्षत्र कोरडेच जात आहे. वापसा होताच या विभागातील शेतकऱ्यांनी सोयाबिन, भुईमूग, मूग, तूर आदी कडधान्यांच्या पेरण्या केल्या. या विभागातील ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. ३० टक्के पेरण्या होणे बाकी आहे. माळशेज घाटात सध्या पाऊस नाही. मुंबईत पाऊस असेल, तर तो माळशेज घाटातही सुरू होतो. नंतर आणे-माळशेज पट्ट्यात पाऊस सुरू होतो; पण सध्या मुंबईत जोरदार पाऊस नसल्याने या भागातही पाऊस नाही.

भातरोेपे पडली पिवळी
कुरूळी : येथील परिसरातील मोई, निघोजे भागात पावसाअभावी भाताची रोपे व कडधान्याची पिके धोक्यात आहेत. या वर्षी अधिकचा मास महिना असल्याने पिकाचे नियोजन गड़बले आहे. परिसरात पेरणी केलेल्या पिकांची उगवण झाली आहे. आवशकतेनुसार विरळनी तर उगवून आलेल्या पिकामध्ये कोळपणी सुरु आहे. भात पिकाबरोबर पेरण्यांना झालेला असल्याने मुग, उडीद, मटकी, सोयाबीन, भुईमुग या सारखी कडधान्याचे पिक हाता बाहेर जाण्याची भीती आहे. खरीप हंगाम हाताशी न आल्यास भात व कडधान्याच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे.

Web Title: Rainbow! Only 30 percent sown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.