पाऊस भात, भुईमुगाला तारणार
By Admin | Updated: September 11, 2015 04:39 IST2015-09-11T04:39:24+5:302015-09-11T04:39:24+5:30
जिल्ह्यात बुधवारी झालेला पाऊस भात व भुईमूग या पिकांसाठी, उशिरा लावलेल्या ज्वारीसाठी फायदेशीर ठरेल. रब्बीच्या पूर्व मशागतींसाठीही हा उपयुक्त आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे

पाऊस भात, भुईमुगाला तारणार
पुणे : जिल्ह्यात बुधवारी झालेला पाऊस भात व भुईमूग या पिकांसाठी, उशिरा लावलेल्या ज्वारीसाठी फायदेशीर ठरेल. रब्बीच्या पूर्व मशागतींसाठीही हा उपयुक्त आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश धुमाळ यांनी आज दिली.
धुमाळ म्हणाले, ‘‘खरिपाला फारसा फायदा होणार नाही. खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात वाया गेला आहे. फक्त ३० टक्के उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे. सोयाबीनची लागवड अनेक पटींनी झाली होती. हे पीकही वाया गेले आहे. बाजरी काढणीच्या अवस्थेत आहे. सध्याच्या पावसाचा भुईमूगपिकाला फायदा होऊ शकेल.’’
भातखाचरांमध्ये पाणी साचल्याने रोपांच्या वाढीसाठी फायदा होईल. भाताला या
पावसामुळे जीवदान मिळाले आहे. खरिपापेक्षा रब्बीचा हंगाम मोठा असतो. या हंगामाच्या पूर्वमशागतींना वेग येऊन पेरण्या लवकर पूर्ण होऊ शकतील, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू
दीर्घ काळानंतर सुरू झालेल्या पावसाने भीमा खोऱ्यातील सर्व २५ धरण प्रकल्पांमध्ये हजेरी लावली. आज सकाळपर्यंत येडगाव धरणात सर्वाधिक ५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाचा धरणातील साठा वाढण्यासाठी मदत होणार आहे. पावसात सातत्य राहिल्यास रब्बी हंगाम समाधानकारक जाऊ शकेल.
दोनच दिवस झालेल्या पावसामुळे दुष्काळाचे चित्र काहीसे पुसले जाऊ लागले आहे. सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत वरसगावमध्ये ४५, टेमघरमध्ये २, पानशेत प्रकल्पात २४ व खडकवासला धरणात १३ मिलिमीटर पाऊस झाला. पिंपरी-चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे सिंचन भवनमधून सांगण्यात आले.
भीमा उपखोऱ्यातील धरणांमध्ये २४ तासांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा : पिंपळगाव जोगे २२, माणिक डोह ७, येडगाव ५२, वडज १३, डिंभे २६, घोड २०, विसापूर १७, कळमोडी २७, चासकमान ३५, भामा ३५, वडीवळे ५०, आंद्रा ३२, कासारसाई २७, मुळशी ९, गुंजवणी २२, भाटघर १६, नीरा देवघर २, वीर ४२, नाझरे ३४, उजनी ७.