सभापती रघुनाथ लेंडेंवर गैरव्यवहाराचा ठपका
By Admin | Updated: May 11, 2017 04:06 IST2017-05-11T04:06:15+5:302017-05-11T04:06:15+5:30
महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे यांच्यावर मनमानी कारभार व अनेक

सभापती रघुनाथ लेंडेंवर गैरव्यवहाराचा ठपका
लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे यांच्यावर मनमानी कारभार व अनेक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून १९ पैकी उपसभापतींसह दिलीप डुंबरे यांच्यासह १४ सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे़ अविश्वास ठराव दाखल झाल्याने राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल बेनके यांचे वर्चस्व असलेल्या या बाजार समितीमध्ये संचालकांची फाटाफूट झाल्याने त्यांना मोठा फटका बसणार आहे़ राष्ट्रवादीचे नेते व बाजार समितीचे विद्यमान संचालक अॅड. संजय काळे यांच्यासोबत १४ सदस्य असल्याने काळे यांचे पुन्हा एकदा बाजार समितीवर वर्चस्व राहण्याची शक्यता सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येते.
बाजार समितीवर गेल्या ५४ वर्षांपासून सहकार महर्षी शिवाजीराव काळे व त्यांचे पुत्र अॅड़ संजय काळे यांचे वर्चस्व होते. शिवसेना व अॅड. काळे यांच्यात गेल्या दोन निवडणुकांपासून युती होती़ दीड वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीतदेखील अॅड. काळे यांनी शिवसेनेशी युती केली होती;
परंतु अतुल बेनके यांनी खेळी करून अजित पवार व दिलीप वळसे-पाटील यांना शिवसेनेशी युती तोडण्यास भाग पाडून अॅड. काळे यांनी स्वतंत्र पॅनल करावा व अतुल बेनके यांच्याशी मिळतेजुळते घ्यावे, असा आदेश अजित पवार यांनी दिला होता़ अॅड. काळे यांनी वरिष्ठांचा आदेश पाळून शिवसेनेशी युती तोडली व राष्ट्रवादीचे पॅनल केले़ दुसरीकडे, अतुल बेनके यांनी शिवसेनेशी हातमिळवणी करून राष्ट्रवादीतील उमेदवारांना बंडखोरी करण्यास भाग पाडले़
या निवडणुकीत अॅड. काळे यांच्या पॅनलला फटका बसून त्यांचे १९ पैकी ७ उमेदवार निवडून आले़ बेनके गटाचे ८ उमेदवार निवडून आले़ तर, शिवसेनेचे ४ उमेदवार निवडून आले. बेनके यांनी शिवसेनेशी युती करून सभापती राष्ट्रवादीचा व उपसभापती शिवसेनेचा असे निश्चित होऊन सभापतिपदी रघुनाथ लेंडे, तर उपसभापतिपदी दिलीप डुंबरे यांची निवड झाली. काही महिन्यांच्या कालावधीत सभापती रघुनाथ लेंडे हे संचालकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात, तसेच संचालक मंडळांना अंधारात ठेवून महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत.