राघोजी भांगरे यांचा लढा आजही प्रेरणादायी

By Admin | Updated: August 9, 2015 03:30 IST2015-08-09T03:30:44+5:302015-08-09T03:30:44+5:30

इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये आदिवासी समाजातील राघोजी भांगरे यांचे नाव घेतले जाते. पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रज सरकारचे राज्य सुरू झाले.

Raghoji Bhangre's fight is still inspirational | राघोजी भांगरे यांचा लढा आजही प्रेरणादायी

राघोजी भांगरे यांचा लढा आजही प्रेरणादायी

घोडेगाव : इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये आदिवासी समाजातील राघोजी भांगरे यांचे नाव घेतले जाते. पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रज सरकारचे राज्य सुरू झाले. तेव्हा पुणे, नाशिक, ठाणे व अहमदनगर जिल्ह्यात इंग्रज व सावकारांविरुद्ध राघोजी भांगरे लढले. राघोजी भांगरेंचा लढा भावी पिढीला प्रेरणादायी ठरणारा आहे.
सन १८२८ मध्ये इंग्रजांनी आदिवासी भागात असलेले किल्ले, घाटमाथे राखण करण्याचे अधिकार काढून घेतले, तसेच अनेक बुरुज नष्ट केले, आदिवासी किल्लेदारांच्या किल्ल्या काढून घेतल्या, वनदऱ्या काढल्या व पगार कमी केले. त्यामुळे आदिवासी वतनदार व किल्लेदार यांच्यात असंतोष पसरला. तसेच गोरगरीब शेतकऱ्यांचा शेतसारा वाढविला. हा वाढलेला शेतसारा भरण्यासाठी आदिवासी लोक सावकारांकडून कर्ज काढू लागले. सावकार शेतकऱ्यांकडून भरमसाट व्याज गोळा करू लागले. शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही, म्हणून शेतकऱ्यांच्या विरोधात दावे दाखल करून मालमत्ता जप्त करण्याचे हुकूमनामे इंग्रजांकडून मिळवत असत.
या सर्व छळवादाला चिडून आदिवासी लोकांनी इंग्रज व सावकारांविरुद्ध बंड पुकारले. त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रामा किरवा याला पकडून सन १८३० मध्ये इंग्रजांनी फासावर लटकवले. यामुळे बंडखोरांमध्ये दहशत बसेल, असे इंग्रजांना वाटत होते; परंतु याचा परिणाम उलट झाला. पुणे व नगर जिल्ह्याच्या परिसरात आदिवासी समाजातील राघोजी व बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार उठाव सुरू झाला. राघोजी भांगरे अकोले तालुक्यातील नेरा गावातील होते.
सन १८३८ मध्ये रतनगडाच्या परिसरात त्यांनी बंड उभे केले. इंग्रज अधिकारी कॅ. मॅकिटोस याने या भागातील खिंड, घाट, रस्ते यांची माहिती करून घेतली व बंडकऱ्यांचे सर्व मार्ग रोखून धरले. बंडखोरांची सर्व गुपिते बाहेर काढून त्यांना वेठीस धरले; मात्र बंडखोर नरमले नाहीत. इंग्रजांच्या ताब्यात असलेली चार ठिकाणे बंडखोरांनी लुटली. इंग्रजांनी हा सर्व भाग मोठे सैन्यबळ उभे केले. याला लोक घाबरले व काही लोक उलटले. माहितीच्या आधारावर इंग्रजांनी ८० लोकांना ताब्यात घेऊन नगरच्या तुरुंगात टाकले. इंग्रजांनी राघोजीला पकडण्याची मोहीम तीव्र केली. त्या काळी राघोजीला पकडण्यासाठी पाच हजार रुपये बक्षीस ठेवले. त्यांच्याजवळचे प्रमुख लोक ठार झाले, त्यामुळे राघोजी भांगरे थकले.
२ जानेवारी १८४८ रोजी इंग्रज अधिकारी लेफ्टनंट गेल याने चंद्रभागेच्या काठी राघोजीला अटक केली. त्याच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. न्यायाधीशांनी त्याला फाशीची शिक्षा सुनावली. फाशी देण्याऐवजी तलवारीने किंवा बंदुकीने वीरपुरुषांसारखे मरण द्या, अशी मागणी त्याने न्यायाधीशांकडे केली; परंतु इंग्रज सरकारने २ मे १८४८ रोजी ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात त्यांना फासावर चढविले. (वार्ताहर)

Web Title: Raghoji Bhangre's fight is still inspirational

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.