निकालानंतर राडा!

By Admin | Updated: August 8, 2015 00:49 IST2015-08-08T00:49:00+5:302015-08-08T00:49:00+5:30

जिल्ह्यात काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या अत्यंत चुरशीच्या झाल्या. निवडणुकीत यश मिळाल्यानंतर विजयाचा उन्माद व पराभवाचे

Rada after the result! | निकालानंतर राडा!

निकालानंतर राडा!

जिल्ह्यात काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या अत्यंत चुरशीच्या झाल्या. निवडणुकीत यश मिळाल्यानंतर विजयाचा उन्माद व पराभवाचे शल्य यामुळे काही ठिकाणी राडा झाला. आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके वाजविल्याने झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान दंगलीत झाले. याप्रकरणी २२ जणांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील ७ जणांना अटक करून आज घोडेगाव न्यायालयात हजर करण्यात आले. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे दोन गटांत भांडणे झाली. त्यानंतर या ठिकाणी आलेले पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांच्यावर बेछूट दगडफेक करून त्यांना जखमी करण्याचा प्रकार घडला. पोलिसांचे वाहन व एसटी बसवर दगडफेक करून काचा फोडण्याचा प्रकार घडला. तर, शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे फटाके वाजविण्यावरून दोन गटांत हाणामारी झाली. ४५ जणांवर गुन्हा दाखल केला असून, १२ जणांना अटक केली आहे.

मंचरला घरात घुसून मारहाण
मंचर : ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराच्या घरासमोर फटाके वाजविल्याने झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान दंगलीत झाले. त्यामुळे भेकेमळा (मंचर) येथे रात्री धुमश्चक्री उडून सूर्यकांत थोरात यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. तसेच इतर दोघांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी २२ जणांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील ७ जणांना अटक करून आज घोडेगाव न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
सूर्यकांत गिरिधर थोरात यांनी मंचर पोलिसांत फिर्याद दिली आहे़ त्यात त्यांनी म्हटले आहे, की गुरुवारी रात्री ८ वाजता आकाश प्रकाश भेके व इतर लोकांनी गावातील बाळणपुरीबाबा मंदिराच्या बाजूला व पराभूत झालेल्या उमेदवार यांच्या घरासमोर फटाके वाजविण्याच्या कारणावरून आमच्यात आणि प्रकाश भेके व इतर लोकांमध्ये शाब्दिक वाद झाला. संभाजी निघोट व बाजीराव मोरडे यांनी प्रकाश भेके यास तुम्ही पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके वाजवू नका असे सांगितले होते. त्या वेळी आकाश भेके व इतर साथीदारांनी शिवीगाळ करून बघून घेतो, अशी धमकी देऊन ते निघून गेले होते.
त्यानंतर सूर्यकांत थोरात हे कुटुंबीयांसह झोपलेले असताना रात्री साडेबारा वाजता भेकेमळा येथील अविनाश भेके याने दरवाजा उघड असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. अविनाश भेके, उत्तम भेके, राजू भेके, प्रकाश भेके यांनी घरात घुसून शिवीगाळ करीत मारहाण केली. भाऊ शशिकांतला प्रकाश भेके याने काठीने मारहाण केली. या वेळी त्यांचे सहकारी विविध दुचाकी वाहनांवरून तेथे आले. त्यांनी दगड, लाकडाचे ओंडके, विटांचे तुकडे सूर्यकांत थोरात यांच्या घरावर फेकून मारले. घराची कौले फोडली, लाईटचा मीटर तोडला़ तसेच दुचाकी फोडली़ त्यांच्या शेजारी राहणारे पांडुरंग दत्तात्रय थोरात यांच्या घरावर दगड मारून लाईट मीटर, दुचाकीचे नुकसान केले आहे. जयसिंंग बजरंग भेके यांच्या घरावर दगडफेक करून त्यांना दुखापत केली. तसेच चारचाकी गाडीचे नुकसान केले. (वार्ताहर)

दगडफेकीत पोलीस जखमी
इंदापूर : निमगाव केतकीत दोन गटांत भांडणे झाली. त्यानंतर या ठिकाणी आलेल्या पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांच्यावर बेछूट दगडफेक करून त्यांना जखमी करण्याचा प्रकार घडला. पोलिसांचे वाहन व एसटी बसवर दगडफेक करून काचा फोडण्याचा प्रकार गुरुवारी (दि. ६) रात्री घडला. त्यात ९ जण जखमी झाले आहेत. त्यांमध्ये एका हवालदारासह ३ होमगार्ड व २ महिलांचा समावेश आहे.
इंदापूर पोलीस ठाण्यात ३ वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. एकूण ३० ते ३२ जणांना गुन्हा दाखल केला आहे. निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य देवराज जाधव यांच्या केतकेश्वर ग्रामविकास पॅनलची सरशी झाली. विजयाच्या उन्मादात अतुल ऊर्फ बाबू राऊत, त्याचे सहकारी अमोल राऊत, शंकर ननवरे, उमेश राऊत, अशोक राऊत यांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास निमगाव केतकी गावाच्या हद्दीतील पराभूत गटाच्या चंद्रकांत राऊत यांच्या घराजवळ दुचाकी नेऊन गोंगाट केला. यावरून झालेल्या वादावादीतून अतुल राऊत व १० ते १२ जणांनी चंद्रकांत राऊत व त्यांच्या कुटुंबियांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याची माहिती इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांना समजली. ते सहकाऱ्यांसह सायंकाळी तेथे गेले. या वेळी ‘केतकेश्वर ग्रामविकास पॅनल’ची मिरवणूक सुरू होती. त्यामुळे ती थांबवून पोलीस निरीक्षक शिंदे यांनी पॅनलप्रमुख देवराज जाधव व त्यांचे कार्यकर्त्यांना ‘मिरवणूक काढू नका’ अशी तंबी दिली. मात्र, त्यांनी मिरवणूक काढणारचं, असे म्हणत पोलिसांवर दगडफेक केली. त्यात हवालदार सुभाष दळवी व तिन्ही होमगार्ड जखमी झाले. पोलिसांच्या वाहनाच्या व लातूर-बारामती एसटी बसच्या काचा दगडफेक करून फोडल्या. दरम्यान, सहकाऱ्यांसह आपण सायंकाळी कान्होबामळा येथील मारुती मंदिरात नारळ फोडत असताना निवडणुकीतील पराभवाचा राग धरून, ‘तू आमच्या रस्त्याने जायचे नाही,’ असे म्हणत उत्तम राऊत याने आपल्या डोक्यात विळा मारून जखमी केले़ तसेच, सुनील राऊत, पराग राऊत, चंद्रकांत राऊत यांनी शिवीगाळ करून, मारहाण केली, अशी तक्रार राऊत यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Rada after the result!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.