तिकीट खिडकीवर रांगच!
By Admin | Updated: June 17, 2015 01:03 IST2015-06-17T01:03:47+5:302015-06-17T01:03:47+5:30
तिकीट काढण्यासाठी गर्दी होते, ती टाळावी आणि प्रवाशांना रेल्वे तिकीट तत्काळ मिळावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने ‘अॅटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन’ (एटीव्हीएम) सुरू केले.

तिकीट खिडकीवर रांगच!
मंगेश पांडे, पिंपरी
तिकीट काढण्यासाठी गर्दी होते, ती टाळावी आणि प्रवाशांना रेल्वे तिकीट तत्काळ मिळावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने ‘अॅटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन’ (एटीव्हीएम) सुरू केले. पण, ही यंत्रणा कुचकामी ठरली आहे. गर्दी टाळण्याचा उद्देश असफल असल्याचे दिसून आले.
‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी पिंपरी, चिंचवड, आकुर्डी स्थानकांची दुपारी साडेचारची लोकल सुटण्याच्या वेळेत पाहणी केली. तेव्हा बहुतांशी ठिकाणच्या या मशिन बंद असल्याचे दिसून आले. तिकिटासाठी खिडकीवर प्रवाशांच्या रांगा होत्या.
पिंपरी स्थानकावर चार मशिन आहेत. मात्र, यातील एकच मशिन सुरू आहे. हे शहरातील महत्त्वाचे आणि मध्यवर्ती स्थानक समजले जाते. या स्थानकावर नेहमीच गर्दी असते. चार ‘एटीव्हीएम’ मशिन बसविण्यात आल्या आहेत. मात्र, यातील एकच मशिन सुरू असून, तीन अद्याप सुरूच झालेल्या नाहीत. या मशिनद्वारे एक व्यक्ती तिकिटे काढून देत असल्याचे दिसले. काही प्रवाशांनी खिडकीवरही रांगा लावल्या होत्या.
चिंचवड स्थानकावर दोन मशिन बसविण्यात आल्या असून, यापैकी एकच मशिन सध्या सुरू आहे.
मात्र, प्रवाशांना याबाबत माहिती नसल्याने बहुतेक प्रवाशी खिडकीतूनच तिकीट घेत होते, तर आकुर्डी स्थानकावर बसविण्यात आलेल्या तीन मशिनपैकी दोन सुरू असून, एक बंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. या स्थानकांवर येणाऱ्यांची गैरसोय होत आहे.
-स्मार्ट कार्ड प्रत्येक स्थानकावरील कार्यालयात उपलब्ध आहे. पन्नास रुपये भरल्यानंतर हे कार्ड मिळते. मोबाईल ‘रिचार्ज’प्रमाणे शंभर रुपयांपासून पुढील रकमेचे ‘रिचार्ज’ या कार्डवर करता येते. दोनशे किलोमीटर अंतरापर्यंतच्या मार्गाची तिकिटे या कार्डद्वारे मशिनवरून काढता येतात.
-सध्या तिन्ही स्थानकांवर सुरू असलेले मशिन आॅपरेट करण्यासाठी रेल्वेतूनच निवृत्त झालेल्या व्यक्ती नेमण्यात आल्या आहेत. या व्यक्तीकडे पैसे देत मशिनमधील तिकीट घेतले जात आहे. यासह स्मार्ट कार्ड असलेले प्रवाशी ‘एटीव्हीएम’ मशिनद्वारे तिकीट मिळवू शकतात. केवळ कार्ड मशिनमध्ये टाकल्यास मशिनच्या स्क्रीनवर मार्गांची यादी येते. आवश्यक असलेल्या मार्गांवर ‘क्लिक’ केल्यास लगेचच तिकीट उपलब्ध होऊ शकते.
स्थानकांवर मशिन बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. शिवाजीनगर, खडकी स्थानकांवर मशिन बसविण्यात आल्या असून, इतर स्थानकांवर बसविण्यात येत आहेत. येत्या दोन महिन्यांत सर्व मशिन कार्यान्वित होतील. प्रवाशांना या मशिनची माहिती होईपर्यंत मशिनद्वारे तिकीट काढण्याचे काम रेल्वेतीलच काही निवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. -ए. बी. मेंढेकर, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक.
स्मार्ट कार्डद्वारे मशिनवरून तिकीट उपलब्ध होण्याची सुविधा चांगली आहे. गर्दी टाळण्यासाठी सुरू करण्यात आलेले हे मशिन एकच असून, उपयोग नाही. त्यासाठी चारही मशिन सुरू करणे गरजेचे आहे; जेणेकरून खिडकीसमोरील रांगा बंद होतील आणि प्रवाशांनाही मशिनद्वारे तातडीने तिकीट उपलब्ध होऊ शकेल.- हरप्रीतसिंग अरोरा, प्रवासी.
रेल्वेने नेहमीच प्रवास करीत असतो. यापूर्वी प्रवास करताना खिडकीतूनच तिकीट घ्यायचो. आज पिंपरी स्थानकावरील खिडकीतून तिकीट घेण्यासाठी गेलो असता त्यांनी मशिनवरून घेण्यास सांगितले. ही सुविधा चांगली आहे. मात्र, त्याबाबत माहिती नव्हते.
- रामचंद्र गेंगजे, प्रवासी
मुंबईत ही सुविधा आहे. मात्र, पुण्यात सुरू झालेल्या या सुविधेबाबत माहिती नव्हती. आता खिडकीवर तिकीट काढायला गेलो असता मशिनवरील व्यक्तीने तिकडे बोलावून घेतले. खिडकीत उभे राहून तिकीट घेण्यापेक्षा मशिनद्वारे सहजरीत्या उपलब्ध होत असल्याने ते अधिक सोयीचे वाटते. पण, ही यंत्रणा व्यवस्थितरीत्या सुरू व्हायला हवी.- अनिकेत गाजरे, प्रवासी.