कांद्यावरील करपा घालविण्यासाठी देशी दारूची मात्रा
By Admin | Updated: September 18, 2015 01:12 IST2015-09-18T01:12:14+5:302015-09-18T01:12:14+5:30
ढगाळ हवामानामुळे सध्या पिकांना विविध रोगांनी ग्रासले आहे. औधांची फवागरणी करूनही काही उपयोग होत नसल्याने विशेषत: कांदा पिकावरील करपा घालविण्यासाठी

कांद्यावरील करपा घालविण्यासाठी देशी दारूची मात्रा
पळसदेव : ढगाळ हवामानामुळे सध्या पिकांना विविध रोगांनी ग्रासले आहे. औधांची फवागरणी करूनही काही उपयोग होत नसल्याने विशेषत: कांदा पिकावरील करपा घालविण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क देशी दारूची मात्रा देण्यास सुरूवात केली आहे.
जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी रमेश धमाळ यांनी दारूमुळे कोणताही रोग अटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांनी असे प्रकार करू नयेत असे आवाहन केले आहे.
गेल्या आठवडाभर जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू झाला आहे. मात्र सगळीकडे ढगाळ हवामान आहे. परिणामी उरल्या सुरल्या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होवू लागला आहे. डाळिंब असेल तर तेल्या, कांदा असेल तर करपा, केळी असेल तर चिकट्या रोग आढळून येत आहे. यामुळे शेतातील पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्याला महागडी औषधे विकत घेऊन, त्या त्या पिकांवर फवारणी करावी लागते. त्यातूनही पीक वाचेल की नाही, याबाबत शंका असते.
सध्या कांदा पिकासाठी अनेक शेतकऱ्यांनी वेगळा पर्याय शोधला आहे. देशी दारूची कांद्यावर फवारणी करून करपा, मान मोडलेला कांदा यावर उपाय शोधला आहे. ‘देशी’ फवारा... अन् कांदा वाचवा’ अशीच चर्चा अनेक ठिकाणी सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी ‘देशी’चा हा प्रयोग केला आहे.
कांद्याला चांगला बाजारभाव आल्याने शेतकरीवर्ग कांदा पिकाकडे अधिक वळला आहे. त्यातच सध्याच्या काळात कांद्याचे दर गगणाला भिडले आहेत. त्यामुळे कांदा काढून लगेचच विक्रीसाठी बाजारपेठेत नेला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा धनलाभ होत आहे, असे असताना पूर्वी लागवड केलेल्या कांद्यावर करपा रोग पडणे, माना खाली टाकणे, जळून जाणे आदी प्रकार घडत आहेत.
त्यामुळे बी-बियाणे, खतांच्या दुकानात औषधे विकत घेण्यासाठी गर्दी होते. मात्र, एवढी महागडी औषधे फवारणी करूनही अनेक वेळा उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांनी हा नवा पर्याय शोधला आहे.
काही शेतकऱ्यांनी ‘देशी’चा प्रयोग केल्याने, इतर शेतकरीही या प्रयोगाचा अवलंब करीत आहेत. पाण्यामध्ये देशी दारूचे मिश्रण करून, त्या मिश्रणाची कांदा पिकावर फवारणी केली जात आहे. त्यामुळे याची चर्चा व केलेला प्रयोग अनेक शेतकरी एकमेकांना सांगू लागल्याने इतर शेतकरीदेखील हा प्रयोग करू लागले आहेत. (वार्ताहर)
दारूची फवारणी
स्वस्तात मस्त...
पिकाच्या संरक्षणासाठी वापरली जात असल्याने देशी दारू पुन्हा चर्चेत आली आहे. याबाबत एका शेतकऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, कांदा पिकावर देशी दारूची फवारणी केल्यास, कांदा पिकावरील सर्व रोग नष्ट होत आहेत. त्यामुळे इतर औषधांपेक्षा देशी दारूची फवारणी स्वस्तात मस्त आहे. तसेच, या फवारणीमुळे कांदा चांगला तरारत आहे, असे ही त्यांनी सांगितले.
दारू फवारणी केल्याने कोणताही रोग आटोक्यात येत नाही. ढगाळ हवामान असल्याने रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र यासाठी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या औषधांचाच वापर केला पाहिजे. सध्या अधूनमधून पाऊस पडत असल्याने औषधे फवारली तरी उपयोग होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे, योग्य प्रमाणात व योग्य वेळी औषधांची फवारणी केली तर रोग नक्कीच आटोक्यात येतील.
रमेश धुमाळ
कृषी अधिकारी, जिल्हा परिषद