कर्जाच्या बोजाखाली रुतलेली पीएमपी टाकतेय कात!
By Admin | Updated: March 8, 2015 00:55 IST2015-03-08T00:55:13+5:302015-03-08T00:55:13+5:30
कर्जाच्या बोजाखाली रुतलेली बस प्रवाशांना चांगली सेवा देऊन सुस्थितीत आणण्यासाठी पीएमपी प्रशासनाने धडपड सुरू केली आहे.

कर्जाच्या बोजाखाली रुतलेली पीएमपी टाकतेय कात!
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा आता कात टाकू लागली आहे. कर्जाच्या बोजाखाली रुतलेली बस प्रवाशांना चांगली सेवा देऊन सुस्थितीत आणण्यासाठी पीएमपी प्रशासनाने धडपड सुरू केली आहे. मागील काही दिवसांपासून त्याला गती आली असून, पुढील काही महिन्यांत ती अधिक वेगाने धावेल, असे चित्र आहे. रंग उडालेली, धुळीत माखलेली, खिडक्या नसलेली आणि खिळखिळी झालेली असे बसचे रुपडे बदलण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
व्यवस्थापनातील योग्य नियोजनाअभावी मागील काही वर्षांपासून पीएमपी तोट्यात चालली होती. त्यामुळे मार्गावरील बसेसची संख्या रोडावली होती. प्रवाशांनाही चांगली सेवा मिळत नव्हती. मात्र, मागील तीन महिन्यांपासून ही स्थिती बदलत चालली आहे. पीएमपी तोट्यातच चालली असली, तरी मार्गावरील बस वाढल्या असून, प्रवाशांनाही चांगली सेवा मिळू लागली आहे. ही सेवा अधिकाधिक चांगली करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने कंबर कसली आहे. पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी त्यादृष्टीने विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. २० मार्चनंतर एकही बस सुट्या भागाअभावी बंद राहणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)
सुधारीत वेळापत्रक मार्चअखेरपर्यंत
मागील काही दिवसांपासून पीएमपीच्या मार्गावरील बसेसची संख्या वाढली आहे. त्यामुळे काही मार्गांवर बसेसची वारंवारताही वाढली आहे. त्याअनुषंगाने मार्चअखेरपर्यंत बसचे सुधारीत वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. तसेच हे वेळापत्रक प्रवाशांना पीएमपीच्या संकेतस्थळावरही पाहायला मिळेल.