‘हेरिटेज’ला धक्का
By Admin | Updated: November 3, 2015 03:37 IST2015-11-03T03:37:23+5:302015-11-03T03:37:23+5:30
ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरात आजही काही पुरातन मंदिरे व विविध वास्तू सुस्थितीत आहेत. इतिहासातील महत्त्वाच्या घटना, प्रसंगाच्या साक्षीदार

‘हेरिटेज’ला धक्का
पुणे : ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरात आजही काही पुरातन मंदिरे व विविध वास्तू सुस्थितीत आहेत. इतिहासातील महत्त्वाच्या घटना, प्रसंगाच्या साक्षीदार असणाऱ्या वास्तूंचा ऐतिहासिक दर्जा (हेरिटेज) जिवंत ठेवणे, ही प्रशासनाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांची जबाबदारी आहे. मात्र, जाणते-अजाणतेपणे या वास्तूंच्या ऐतिहासिक दर्जाला धक्का लागल्याचे दिसून येत आहे.
पुणे शहरात शनिवारवाडा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डेक्कन कॉलेज, पर्वती, शिंदे छत्री, लाल देऊळ केवळ एवढ्याच वास्तू ऐतिहासिक असाव्यात, असे अनेकांना वाटते. मात्र, पुरातत्त्व विभागाकडे उपलब्ध माहितीच्या आधारे शहरातील ६४ वास्तूंना ऐतिहासिक दर्जा देण्यात आला आहे. त्यात मंदिर, मशीद, चर्च, वाडे, शैक्षणिक संंकुलाच्या इमारती, ग्रंथालयाच्या इमारती, लष्कर भागातील काही इमारतींचा आदींचा समावेश आहे. या वास्तू आपल्या पुढच्या पिढ्यांना पाहायला मिळाव्यात, त्यासाठी त्यांचा ऐतिहासिकपणा जपला गेला पाहिजे. त्यामुळे या वास्तूंना आधुनिक रंग देणे, मूळ वास्तूच्या बांधकामामध्ये हस्तक्षेप करणे, वास्तूच्या परिसरात दुसरे कोणतेही बांधकाम करणे बेकायदा आहे. मात्र, काही मोठ्या वास्तू वगळता बहुतांश सर्वच वास्तूंना रंगरंगोटी करण्यात आली असून, या वास्तूंच्या परिसरात लहान-मोठी बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील पुरातन वास्तूंच्या ऐतिहासिक दर्जाला धक्का बसला आहे.
पुणे विभागीय पुरातन विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे म्हणाले,
पुरातत्त्वविभाग म्हणते...
हेरिटेज दर्जाच्या वास्तूंच्या दुरुस्तीचे काम करताना त्या वास्तूतील ऐतिहासिकपणा जाऊ नये याची काळजी घ्यावी लागते. संबंधित ट्रस्ट किंवा संस्थेने याबाबत पुरातत्त्व विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्या वास्तूच्या २०० मीटरच्या परिसरात दुसरे उंच बांधकाम करता येत नाही. त्याचप्रमाणे वास्तूला रंगरंगोटीही करता येत नाही.
पुरातत्त्व विभागाने सध्या एखादी हेरिटेज वास्तू ताब्यात घेतली नाही. त्यामुळे पुढील काळात ती घेतली जाणार नाही, असा गैरसमज करून घेऊ नये. पुरातत्त्व विभागाला एखाद्या वास्तूचे महत्त्व उशिरा लक्षात आले. तर संबंधित वास्तू केव्हाही ताब्यात घेतली जाऊ शकते, असे पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे यांनी स्पष्ट केले.
ऐतिहासिक वारसा जपून ठेवण्यासाठी काही वास्तू पुरातत्त्व विभागाने संरक्षित करून ठेवलेल्या असतात.त्यातील काही वास्तूंना हातही लावता येत नाही.तर पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काही वास्तूंची दुरुस्ती करता येते.आपल्या पुढच्या पिढीसाठी अशा ऐतिहासिक वास्तूंची काळजी घ्यायला हवी.
-गो.बं.देगलूरकर,
ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासक व कुलपती,डेक्कन कॉलेज