आॅगस्टमध्ये घुमणार पुरुषोत्तमचा आवाज...
By Admin | Updated: July 2, 2017 02:58 IST2017-07-02T02:58:28+5:302017-07-02T02:58:28+5:30
नऊ संघांत कोण जाणार? ५१ संघांत कोणाला स्थान मिळणार? याची चर्चा आता महाविद्यालयीन विश्वात रंगू लागली आहे. यंदाच्या पुरुषोत्तम

आॅगस्टमध्ये घुमणार पुरुषोत्तमचा आवाज...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नऊ संघांत कोण जाणार? ५१ संघांत कोणाला स्थान मिळणार? याची चर्चा आता महाविद्यालयीन विश्वात रंगू लागली आहे. यंदाच्या पुरुषोत्तम करंडक २0१७ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, ही स्पर्धा दोन टप्प्यांत पार पडणार आहे. दरवर्षी आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात होणारी स्पर्धेची प्राथमिक फेरी यावर्षी बाप्पांच्या आगमनापूर्वी म्हणजे ८ ते २३ आॅगस्टदरम्यान तर अंतिम फेरी गणेशोत्सवानंतर ९ सप्टेंबरपासून रंगणार आहे. ही स्पर्धा जवळपास सव्वा महिना चालणार आहे.
सर्वसाधारणपणे आॅगस्ट-सप्टेंबर महिना हा सणासुदीचा काळ असतो, निसर्गाच्या अभूतपूर्व संक्रमणाने आसमंतात नवनिर्मितीचा एक वेगळाच उत्साह संचारलेला असतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही हा दोन महिन्यांचा हंगाम सृजनशील अभिव्यक्तीमधून चैतन्य निर्माण करणारा ठरतो. त्याचे कारण म्हणजे ‘पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा!’ गेल्या पन्नास वर्षांत ही स्पर्धा महाविद्यालयीन जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. कलात्मक अभिव्यक्तीच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या या स्पर्धेची प्रतीक्षा प्रत्येक विद्यार्थी करीत असतो.
दरवर्षी प्राथमिक आणि अंतिम फेरी सलगपणे घेतली जाते केवळ त्यात काही दिवसांचाच कालावधी असतो. यंदा स्पर्धेदरम्यान २५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर या काळात गणेशोत्सव आला आहे. त्यामुळे दरवर्षी १३ ते १६ आॅगस्टच्या आसपास सुरू होणारी स्पर्धेची प्राथमिक फेरी यंदा आठवडाभर आधी दि. ८ आॅगस्टपासून घेण्यात येणार आहे. अंतिम फेरी गणेशोत्सव संपल्यानंतर दि. ९ व १0 सप्टेंबरला होणार असल्याची माहिती महाराष्ट्र कलोपासक संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली. तसेच कै. राजाभाऊ नातू स्मृतिदिना निमित्त दि. १६ जुलै २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता श्री. प्रदीप वैद्य निर्मित ‘हो - नाझी’ हा दीर्घांक सादर होणार आहे.
वेळापत्रक
स्पर्धा प्रवेश अर्ज वाटप : १४ व १५ जुलै २०१७
स्क्रिप्ट आणि सेन्सॉर सर्टिफिकेट जमा : २२ व २३ जुलै २०१७
स्पर्धा प्रवेश अर्ज जमा : ३ आॅगस्ट २०१७
स्पर्धा लॉट्स : ५ आॅगस्ट २०१७
प्राथमिक फेरी : ८-२३ आॅगस्ट २०१७
अंतिम फेरी : ९-१० सप्टेंबर २०१७
पारितोषिक विजेत्या एकांकिकेचे चित्रीकरण : ११ सप्टेंबर २०१७