खुनाचा प्रयत्न, चौघांना पाठलाग करुन पकडले
By Admin | Updated: July 9, 2015 23:24 IST2015-07-09T23:24:58+5:302015-07-09T23:24:58+5:30
किरकोळ कारणांवरून झालेले भांडण सोडविण्यास गेलेल्या तरूणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.

खुनाचा प्रयत्न, चौघांना पाठलाग करुन पकडले
लोणी काळभोर : किरकोळ कारणांवरून झालेले भांडण सोडविण्यास गेलेल्या तरूणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या पाच पैकी चौघांना गुन्हे शोध पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून मरकळ (ता. खेड) येथे जेरबंद करण्यात यश मिळवले़ त्यामधे एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून दोघे जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. ए. कोडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आनंद उर्फ अनिल महादेव चव्हाण (वय १९, रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती), इम्तीयाज खाजाखान पठाण (वय २४, रा़ कदमवाकवस्ती), अफसर ऐसान अन्सारी (वय १९, मुळ रा. कदमवाकवस्ती. सध्या मरकळ ता.खेड) व १७ वर्षे वयाचा एक अल्पवयीन मुलगा या चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा साथिदार हैदर ईराणी हा पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.
३ जुलै रोजी रात्री ९़१५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अविनाश अशोक होनराव (वय ३५, रा.राममंदीरानजीक लोणी काळभोर) हे कदमवाकवस्ती येथील किराणा दुकानासमोर त्यांचे मित्र संदीप जाधव यांचेशी गप्पा मारत ऊभे असताना तेथे दुचाकीवरून आनंद चव्हाण, हैदर ईराणी व अल्पवयीन मुलगा असे तिघे येवून थांबले. त्यांचे पाठीमागून दुकानाशेजारी राहणारे कल्याण पवार आले व त्यांनी एवढ्या जोरात गाडी का चालवता ? अशी विचारणा करताच तिघांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की चालू केली. चव्हाण याने पवार यांना मारण्यासाठी कोयता ऊगारला, त्यावेळी होनराव हे मध्ये पडले असता चव्हाण याने ‘भांडणात मध्ये पडतोस काय तुलाच खल्लास करतो’ म्हणत हातातील कोयता होनराव यांचे डोक्यात मारला. तो वार होनराव यानी ऊजव्या हातावर झेलला. गंभीर जखमी झाल्याने ते ओरडू लागले त्यावेळी ते तिघेही शिवीगाळ करत निघून गेले.
लोणी काळभोर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस ऊप निरीक्षक दिलीप पवार,पोलीस हवालदार दत्तात्रय गिरमकर, बाळासाहेब चोरामले, रॉकी देवकाते, स्वप्निल अहिवळे यांनी आरोपी हे मरकळ येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने तेथे सापळा रचला तेथे पठाण व अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले. परंतू पोलीसाची चाहूल लागताच चव्हाण, अन्सारी व ईराणी हे पळून गेले. त्यातील चव्हाण व अन्सारी या दोघांना सुमारे तीन किलोमीटर पाठलाग करून इंद्रायणी-भिमा नदीच्या संगमापलीकडे पकडण्यात आले. या कामात पोलीस पथकाला तेथील पंचायत समिती सदस्य रविंद्र चव्हाण व पोलीस पाटील बाळासाहेब टाकळकर यानी बहुमोल मदत केली. ईराणी हा अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला.
(वार्ताहर)