लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : १४ नंबर येथील हॉटेलमध्ये विसरलेल्या पर्स मधील चार तोळे गंठन आणि इतर सोन्याचे दागिने आणि पैसे असलेली पर्स वेटरच्या प्रामाणिकपणामुळे पुन्हा मिळाली. दागीने परत मिळाल्याने महिलेला अश्रू अनावर झाले.
राधा रगंनाथ गाड़ेकर या चाकणहून राहाता येथे जात असताना त्या चौदानंबर येथील अनिल यादव यांच्या श्री स्वामी समर्थ वडापाव सेंटर येथे नाष्टा करण्यासाठी थांबल्या होत्या. नजर चुकिने त्यांची पर्स तेथेच विसरली. ही बाब त्यांना रात्री घरी पोहचल्यावर लक्षात आली. त्यांच्या पर्स मध्ये चार तोळ्याचे गंठण, चैन, नथ व महत्वाची कागदपत्रे आणि पैसे होते. राधा गाड़ेकर यांनी त्यांचे नारायणगाव येथील नातेवाईक अमोल हिरे यांना फोन द्वारे माहिती दिली. त्यांनी तात्काळ चौदानंबर येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र भोर यांना फोन करून घडलेली हाकिकत सांगताच त्यांनी हॅाटेल मालकास फोन केला असता ही पर्स युनूस शेख या वेटरला सापडली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ती पर्स त्याने अनिल यादव यांच्याकडे ती पर्स सुपुर्द केल्याचेही सांगितले. ही पर्स त्यांनी गुरूवारी गाडेकर यांना सुपूर्त केली. पर्स मधील सर्व वस्तु पाहुन गाडेकर यांना अश्रु अनावर झाले. वेटरच्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गाडेकर व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र भोर यांनी वेटरच्या प्रामाणिकपणाबद्दल रोख बक्षीस देऊन सन्मान केला.
फोटो - हॉटेलमध्ये विसरलेली सोने व पैसे असलेली पर्स वेटरच्या प्रामाणिकपणामुळे राधा गाडेकर याना सुपूर्त करताना अनिल यादव व मान्यवर