९५ हजारांत चार मुलांची खरेदी, १५ दिवस काम करून मुलांनी काढला पळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST2021-09-02T04:25:49+5:302021-09-02T04:25:49+5:30
पुणे : मधुबनी (बिहार) येथील चार अल्पवयीन मुलांना ९५ हजारांत विकत घेऊन त्यांना सोलापुरात रस्त्याच्या कामाला लावले. सोलापुरात ...

९५ हजारांत चार मुलांची खरेदी, १५ दिवस काम करून मुलांनी काढला पळ
पुणे : मधुबनी (बिहार) येथील चार अल्पवयीन मुलांना ९५ हजारांत विकत घेऊन त्यांना सोलापुरात रस्त्याच्या कामाला लावले. सोलापुरात त्यांना मारहाण झाली. जेवायला दिले नाही. १५ दिवस मारहाण सहन केल्यानंतर त्या मुलांनी सोलापुरातून पळ काढला आणि बुधवारी (दि.१) सकाळी पुणे स्थानक गाठले. पुणे स्थानकावर भेदरलेल्या अवस्थेत ही मुले रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफला) आढळून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पुणे आरपीएफने या प्रकरणाचा तपास चालू केला आहे.
बिहारमधून आणलेल्या या मुलांना आपल्या मूळगावी मधुबनी येथे जायचे होते. त्यामुळे त्यांनी सोलापूर रेल्वे स्थानक गाठल्यानंतर मिळाली त्या रेल्वेत बसून पळ काढला. त्यामुळे ती पुण्यात पोहोचली. बुधवारी सकाळी ती पुणे स्थानकावर उतरली त्यावेळी फलाटावर गस्त घालणाऱ्या जवानांच्या नजरेस ती पडली. त्यांना विश्वासात घेऊन बोलते केल्यानंतर त्यांनी त्यांची कहाणी उघड केली.
एका इसमाने काम मिळवून देतो असे सांगून त्या चौघांना सोलापूरला आणले. ज्या व्यक्तीने त्यांना सोलापूरला आणले ती व्यक्ती सतत त्यांना ‘तुम्हाला मी ९५ हजारांत विकत घेतले’ असे वारंवार सांगत होती, अशी माहिती या मुलांनी जवानांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून जवानांनी साथी पुणे रेल्वे चाइल्ड लाईनशी संपर्क साधून पुढील कायदेशीर कारवाईस सुरुवात झाली आहे. या मुलांना बिहारमधून आणणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा तपास सुरू आहे.
चौकट
तस्करीचा संशय
“प्रथमदर्शनी हे प्रकरण मुलांच्या तस्करीचे वाटते आहे. आम्ही त्याच बाजूने तपास करीत आहोत.”
-उदय पवार, विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, पुणे