लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : रशियन कुमार व्हाईट नाईट्स स्पर्धेत पुण्याच्या पूर्वा बर्वे हिने लक्षवेधी कामगिरी करीत कांस्यपदक मिळवले. रशियामधील अरीना गॅटचिना येथे झालेल्या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत ४३व्या क्रमांकावर असलेल्या १६ वर्षीय पूर्वाने पदक जिंकले. उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या थायलंडच्या छासीनी कोरेपाप हिच्याकडून चुरशीच्या लढतीत १८-२१, २०-२२ने पराभूत झाल्याने तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत दाखल होण्याआधी पूर्वाने उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या युलिआ वासीलयेवा हिचा २१-१०., २१-१५ असा केवळ २७ मिनिटांमध्ये पराभव केला. तत्पूर्वी, तिने दुसऱ्या फेरीत रशियाच्या अॅनास्ताशिया शारापोव्हा हिचे २१-१२, २१-२३, २१-१४ने, तर पहिल्या फेरीत रशियाच्याच मारीया एम. हिचे आव्हान २१-९, २१-१६ने संपविले होते. उपांत्य फेरीतील पराभवाआधी पूर्वाने ४ स्पर्धांमध्ये सलग २१ सामने जिंकले होते. यादरम्यान तिने इस्त्रायल कुमार स्पर्धेत, इटालियन स्पर्धेत व केरळ येथे झालेल्या अखिल भारतीय कुमार मानांकन स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवले होते. पूर्वा ही पुण्यातील निखिल कानिटकर बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षण घेते.
रशियन बॅडमिंटन स्पर्धेत पुण्याच्या पूर्वा बर्वेला कांस्य
By admin | Updated: July 3, 2017 03:29 IST