पुरंदरमध्येही आघाडीची शक्यता संपली
By Admin | Updated: February 4, 2017 03:56 IST2017-02-04T03:56:41+5:302017-02-04T03:56:41+5:30
पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँंग्रेस आणि कॉँग्रेसची आघाडी होण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा होती. आज कॉँग्रेसने जिल्ह्यातील पहिली १५ उमेदवारांची नावे

पुरंदरमध्येही आघाडीची शक्यता संपली
जेजुरी : पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँंग्रेस आणि कॉँग्रेसची आघाडी होण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा होती. आज कॉँग्रेसने जिल्ह्यातील पहिली १५ उमेदवारांची नावे जाहीर केली. यात पुरंदर तालुक्यातीलही एक जागा जाहीर करून काँंग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसची आघाडी होणार नसल्याचेच संकेत दिले आहेत. तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, मनसे, शेकाप अशी बहुरंगी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीकडून आघाडीसाठी प्रयत्न चालवलेले होते. यात राष्ट्रवादी काँंग्रेसला यश आले नाही. काँंग्रेसने झिडकारले तर इतर पक्षांशी आघाडी करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. काँग्रेसकडून आज आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले असले तरीही राष्ट्रवादीकडून आजही आघाडी होणार असल्याचीच चर्चा तालुक्यात सुरू ठेवलेली आहे. काँग्रेसने केवळ एक जागा जाहीर केली आहे. अजूनही जिल्हा परिषदेच्या तीन आणि पंचायत समीतींच्या ८ जागा जाहीर केलेल्या नाहीत, असाही सूर लावला जात आहे. कदाचित ही राष्ट्रवादीची एक निवडणुकीची रणनीतीही असू शकते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आम्ही आज १५ जागांची यादी जाहीर केलेली आहे. दोन दिवसांत सर्वाच्या सर्व जागांची यादी जाहीर केली जाणार आहे. पुरंदरच्याबाबतीत आघाडीची चर्चा असल्याचे माध्यमातूनच वाचावयास मिळते. मात्र पुरंदर तालुक्यातही आम्ही स्वबळावर पक्ष चिन्हावरच सर्वच्या सर्व जागा लढवणार आहोत.