पुरंदर, भोरला पावसाने झोडपले
By Admin | Updated: September 14, 2015 04:34 IST2015-09-14T04:34:10+5:302015-09-14T04:34:10+5:30
परतलेल्या पावसाने आज पुरंदरचा पश्चिम भाग व भोर तालुक्यात दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलसा मिळाला

पुरंदर, भोरला पावसाने झोडपले
पुणे : परतलेल्या पावसाने आज पुरंदरचा पश्चिम भाग व भोर तालुक्यात दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलसा मिळाला. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी शिंदेवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेच्या आठवणी या पावसाने पुन्हा ताज्या झाल्या. पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
आज पडलेल्या पावसाने गेल्या तीन महिन्यांतील तूट भरून निघेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
भोर तालुक्यात पुणे-सातारा महामार्गावरील वेळू, शिंदेवाडी, ससेवाडी, गोगलवाडी परिसरात वादळीवाऱ्यासह सुमारे ३ तास पाऊस झाला. वेळू, शिंदेवाडी फाट्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.
पुरंदर तालुक्यात सासवड शहरासह पश्चिम भागाला चांगलेच झोडपून काढले. शहरातील रस्त्यांना ओढ्या - नाल्याचे स्वरूप आले होते. पश्चिम पुरंदर परिसरात चांबळी , बोपगाव, हिवरे परिसरात दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. जवळपास सर्व बंधारे तुडूंब भरून वाहू लागले. तर चांबळीच्या चरणावती नदीला सायंकाळी मोठ्या प्रमाणात पाणी आले. श्रीनाथवाडी येथील १५ ते २० घरात पाणी शिरल्याने येथील नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. हिवरे परिसरात सर्वच बंधारे भरून वाहू लागले होते. (प्रतिनिधी)