बंदी असताना व्यापार केल्याने बारा अडत्यांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:15 IST2021-05-05T04:15:47+5:302021-05-05T04:15:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने कोरोनाला आळा घालण्यासाठी मार्केट यार्डातील गर्दी ...

बंदी असताना व्यापार केल्याने बारा अडत्यांवर दंडात्मक कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने कोरोनाला आळा घालण्यासाठी मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यावर पुणे बाजार समिती प्रशासनाने भर दिला आहे. यामुळेच आतील आणि बाहेरील गाळे दिवसाआड सुरू ठेवण्यात येणार आहेत.
मात्र, सोमवारी (दि. ३) बाहेरील बाजूचे गाळे सुरू होते. आतील बाजूचे बंद असतानाही फळ विभागातील १२ अडत्यांनी व्यापार सुरू ठेवला होता. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २० हजार ६० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे मार्केट यार्डातील भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, केळी, पान, फुले आणि गूळ-भुसार विभागातील गर्दी कमी करण्यासाठी सातत्याने उपाययोजना केल्या जात आहेत. शेतीमाल घेऊन येणार्या गाड्या, माल खरेदीसाठी येणार्या गाड्यांच्या कालावधीसह खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे. बाजारात अधिक गर्दी होणार नाही, यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.
फळ विभागातील गाळ्यांमध्ये व्यापार
फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागातील बाहेरील आणि आतील गाळे दिवसाआड सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार काल बाहेरील गाळे सुरू होते. मात्र, फळ विभागातील आतील बाजूच्या अडत्यांनी व्यापार सुरूच ठेवला होता. त्यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या आदेशानुसार फळ विभागप्रमुख बाबासाहेब बिबवे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब कोंडे यांनी ही कारवाई केली.