पुणेकरांचा घसा ‘जाम’
By Admin | Updated: July 14, 2014 04:46 IST2014-07-14T04:46:38+5:302014-07-14T04:46:38+5:30
ढगाळ हवामान, तापमानातील चढ-उतार आणि पडू लागलेल्या पावसामुळे पुणेकरांचा घसा ‘जाम’ झाला

पुणेकरांचा घसा ‘जाम’
राहुल कलाल, पुणे
ढगाळ हवामान, तापमानातील चढ-उतार आणि पडू लागलेल्या पावसामुळे पुणेकरांचा घसा ‘जाम’ झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पुण्यात सर्दी-खोकला, साधा आणि डेंगी-मलेरियासदृश ताप, घसादुखीने पुणेकरांना घेरले आहे, यामुळे दवाखान्यांमध्ये रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे.
> जून महिन्यात येणारा पाऊस जुलै महिन्यात आल्याने हवामानात मोठे बदल होत आहेत. कधी ऊन, कधी ढगाळ हवामान तर कधी पाऊस अशा वातावरणामुळे हवेतील विषाणूंच्या वाढीसाठी पोषण वातावरण निर्माण झाले आहे आणि या विषाणूंनी पुणेकरांवर हल्लाबोल केला आहे.
> प्रामुख्याने हवेतून आणि अन्नातूून शरीरात प्रवेश करणाऱ्या या विषाणूंमुळे सर्दी-खोकला, ताप येणे, घसादुखी, उलटी, जुलाब या आजारांचे प्रमाण वाढले आहे. पालिकेच्या दवाखान्यांसह खासगी दवाखान्यांमध्येही या रुग्णांचे उपचारासाठी येण्याचे प्रमाण वाढले आहे.
> पुणे महापालिकेच्या लेले दवाखान्यातील डॉक्टर नीला लिमये म्हणाल्या, ‘गेल्या आवठड्यापासून हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत.’
> त्यातच दोन-तीन दिवसांपासून पाऊसही सुरू झाल्याने सर्दी-खोकला, घसादुखी आणि ताप या रुग्णांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. याचबरोबर डेंगी आणि मलेरियासदृश रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे.
> उलटी, जुलाब या रुग्णांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब हे आजार होत असल्याने पाणी गाळून, उकळून प्यावे, बाहेरचे खाणे, पावसात भिजणे टाळावे.