पुण्याचे राजकारण अस्वस्थ
By Admin | Updated: September 26, 2014 05:32 IST2014-09-26T05:32:07+5:302014-09-26T05:32:07+5:30
गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेशी असलेला घरोबा संपुष्टात आल्याने शहर भाजपमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे

पुण्याचे राजकारण अस्वस्थ
पुणे : गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेशी असलेला घरोबा संपुष्टात आल्याने शहर भाजपमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे महापालिकेत शिवसेनेपेक्षा १0 नगरसेवक जास्त असले, तरी भाजपमध्ये असलेले गटातटाचे राजकारण आणि भाजपच्या तुलनेत शिवसेनेची शहरात असलेली संघटनात्मक बांधणी यामुळे शहरातील आपले तीन बालेकिल्ले वाचविण्याचे आव्हान शहर भाजपपुढे असल्याने भाजपमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल शिरोळे यांना तब्बल २ लाख ९६ हजार मताधिक्य मिळाले. त्यात शिवसेनेचाही मोठा वाटा होता. विशेष म्हणजे शिवसेनेचे आमदार असलेल्या कोथरूड मतदारसंघातून शिरोळे यांना तब्बल १ लाख २२ हजार मते मिळाली होती. त्यामुळे शिवसेनेची ताकद पुन्हा अधोरेखित झाली होती. तसेच मागील विधानसभा निवडणुकीतही नव्याने निर्माण झालेल्या पर्वती मतदारसंघातही शिवसेनेच्या मदतीने भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ विजयी झाल्या होत्या. २0११ मध्ये खडकवासला मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या मदतीने भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.
मात्र, निवडणुका अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपल्या असताना आता भाजपला सर्व मतदारसंघांची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. मात्र, युती होणार नाही हे गृहीत धरून सर्व मतदारसंघांतून सक्षम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी भाजपने यापूर्वीच केली होती. त्यात विद्यमान तीन आमदारांबरोबरच शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघात युती असल्याने भाजपकडून विधानसभेनंतर पक्षबांधणी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे सर्व शक्यता गृहीत धरूनच भाजपने सेनेच्या ताब्यात असलेल्या कोथरूड, कॅन्टोन्मेंट, वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघांतून उमेदवारांना तयारी करण्याचे संकेत देण्यात आले होते. त्यानुसार, अनेक इच्छुकांनी तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे भाजपला या मतदारसंघामध्ये उमेदवारांसाठी फारशी शोधाशोध घ्यावी लागणार नसली, तरी लोकसभेत चाललेला मोदी फॅक्टर विधानसभेत न चालल्यास सेनेच्या उमेदवाराबरोबरच भाजपच्या उमेदवारांची सरळ सरळ लढत होणार आहे. त्यात शिवसेना वरचढ होण्याची शक्यता असल्याने भाजपमध्ये ही अस्वस्थता आहे.(प्रतिनिधी)