स्मार्ट सिटीसाठी पुण्याला करावी लागणार स्पर्धा

By Admin | Updated: September 3, 2015 03:20 IST2015-09-03T03:20:55+5:302015-09-03T03:20:55+5:30

स्मार्ट सिटीसाठी देशभरातून निवडण्यात आलेल्या १०० शहरांकडून पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये समावेश होण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे.

Pune will have to compete for Smart City | स्मार्ट सिटीसाठी पुण्याला करावी लागणार स्पर्धा

स्मार्ट सिटीसाठी पुण्याला करावी लागणार स्पर्धा

पुणे : स्मार्ट सिटीसाठी देशभरातून निवडण्यात आलेल्या १०० शहरांकडून पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये समावेश होण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. मात्र, घोषित होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये आता २० ऐवजी १० शहरांचा समावेश केला जाण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. असे झाले तर पहिल्या टप्प्यात समावेश होण्यासाठी पुणे महापालिकेला मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शहरांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून त्यांचा मेकओव्हर करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केली आहे. त्याकरिता देशभरातून १०० शहरांची निवड करण्यात आली आहे. मात्र, १०० शहरांचा टप्प्याटप्प्याने स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २० शहरांची निवड केली जाणार असल्याचे यापूर्वी घोषित करण्यात आले होते. मात्र, स्मार्ट सिटीसाठी अंदाजपत्रकात निधीची केलेली तरतूद अपुरी पडत असल्याने पहिल्या टप्प्यात २० ऐवजी दहाच शहरांचा समावेश करण्याचा विचार केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून करण्यात येत आहे.
राज्याकडे प्रस्ताव सादर करताना आयुक्त कुणाल कुमार यांनी नागरिकांकरिता ‘स्मार्ट पुणं, माझं पुणं’ ही अभिनव स्पर्धा घेतली. त्यातून अनेक चांगल्या कल्पना पालिकेला मिळाल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी करताना केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर, केंद्राकडे आता प्रस्ताव सादर करताना पुन्हा आपले शहर कसे स्मार्ट बनवावे, हे जाणून घेतले जाणार आहे.
स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी मॅकेन्झी कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. केंद्राला १०० दिवसांमध्ये हा
प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात
केंद्र शासनाच्या समितीसमोर स्मार्ट सिटी योजनेचे सादरीकरण करावे लागणार आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Pune will have to compete for Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.