पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कमधून पुणे-पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागासह मुंबई- बंगळुरू महामार्गावर इन-आउटच्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त वॉर्डन नियुक्ती करण्याची मागणी वाहतूक पोलिस प्रशासनाने करावी. त्यासाठी ‘पीएमआरडीए’ने मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मंगळवारी दिले.
डॉ. पुलकुंडवार यांनी हिंजवडी आयटी पार्क आणि परिसर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त योगेश म्हसे यांच्यासह महावितरण, एमआयडीसी, पीएमआडीए, जिल्हा प्रशासन, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे प्रादेशिक परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत प्रशासनाने अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू केली. वाहतुकीला अडथळा ठरणारी बांधकामे, पत्राशेड हटविण्याची धडक मोहीम हाती घेतली. त्यानंतर आता रस्ते प्रशस्त करण्याच्या कामाला गती देण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्तांनी केलेल्या सूचना
1. प्रशासकीय कामांना दिरंगाई होत असेल, तर अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करावा.
2. वाहतूक वाॅर्डन मागणी केल्यानुसार, पीएमआरडीए उपलब्ध करून देईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी तशी मागणी करावी.
3. महावितरणचे ट्रान्स्फार्मर आणि ओव्हर हेड वायर वाहतुकीला अडथळा ठरत असतील, तर ते स्थलांतरित करणे.
4. वाहतूक समस्या निर्माण होणाऱ्या ठिकाणी आवश्यकतेनुसार एकेरी वाहतूक व्यवस्था करणे.
5. भूसंपादनाचे काम गतिमान करावे. शेतकऱ्यांना विश्वासात घेणे आणि रस्त्याची जागा ताब्यात घेणे.
6. पीएमपीएमएल बसथांबे योग्य ठिकाणी निश्चित करणे.