आविष्कार संशोधन स्पर्धेत पुणे अव्वल
By Admin | Updated: January 23, 2015 23:51 IST2015-01-23T23:51:54+5:302015-01-23T23:51:54+5:30
नागपूर येथे झालेल्या विद्यापीठस्तरीय नवव्या आविष्कार संशोधन स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सातव्यांदा सर्वसाधारण विजेतेपदावर नाव कोरले आहे.
आविष्कार संशोधन स्पर्धेत पुणे अव्वल
पुणे : नागपूर येथे झालेल्या विद्यापीठस्तरीय नवव्या आविष्कार संशोधन स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सातव्यांदा सर्वसाधारण विजेतेपदावर नाव कोरले आहे. संशोधन प्रकल्पांसाठी विद्यापीठातील विविध शाखांतील ८ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून, ६ विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना दुसरा क्रमांक मिळाला.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी दरवर्षी ‘आविष्कार’ या स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धेचे हे नववे वर्ष होते. शैक्षणिक वर्ष २०१४-१५ ची स्पर्धा नागपूर येथील महाराष्ट्र पशू मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये दि. २१ ते २३ जानेवारी या कालावधीत उत्साहात पार पडली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शाखांतील एकूण ४८ विद्यार्थ्यांची या स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यापैकी १४ विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना पुरस्कार मिळाले. आठ विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक तर सहा विद्यार्थ्यांना दुसरा क्रमांक मिळाला.
स्पर्धेतील एकूण ६ विद्याशाखानिहाय पारितोषिकांपैकी तीन पारितोषिकेही विद्यापीठाला मिळाली आहेत. विद्यार्थ्यांच्या एकूण कामगिरीवर विद्यापीठाला सर्वसाधारण विजेतेपद देण्यात
आले.
आतापर्यंत नऊ वेळा झालेल्या स्पर्धेत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सात वेळा या स्पर्धेवर नाव कोरले आहे. स्पर्धेतील पहिली पाच वर्षे पुणे विद्यापीठाचे वर्चस्व होते. स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना राजभवन आविष्कार फेलोशिप दिली जाणार आहे, अशी माहिती महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे विशेष कार्याधिकारी डॉ. रवींद्र जायभाये यांनी दिली. (प्रतिनिधी)
१. मानव्य विद्या, भाषा व ललित कला : शमिका खटावकर, संदीप आरोटे
२. वाणिज्य, व्यवस्थापन व विधी : रती चंद्रा, आनंद कोल्हारकर
३. विज्ञान : मंदार वजगे
४. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान : तुषार दामले, योगेश कुलकर्णी, गिरीश मोडक, रामकृष्ण मोरेश्वर
५. कृषी व पशुपालन : स्वरुपा चौधरी
६. वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र : रुचा वितोंडे, स्वाती सक्सेना, श्रद्धा हिडादुगी, वंदना गावंडे
संशोधनाला प्राधान्य देणार
विद्यापीठाने नेहमीच शिक्षणाबरोबर संशोधनालाही प्राधान्य दिले आहे. विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, महाविद्यालये तसेच विविध विभागांनी संशोधनात चांगले काम केले आहे. आविष्कार स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश उल्लेखनीय असेच आहे. विद्यापीठामध्ये यापुढेही संशोधनाला प्राधान्य दिले जाईल.
- डॉ. वासुदेव गाडे,
कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ