पुणे: नातवाचा खून करून आजोबांनी केली आत्महत्या
By Admin | Updated: March 19, 2016 10:33 IST2016-03-19T09:29:03+5:302016-03-19T10:33:18+5:30
कौटुंबिक वादातून आजोबांनी १० वर्षाच्या नातवाचा खून करून स्वतः ७व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

पुणे: नातवाचा खून करून आजोबांनी केली आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १९ - कौटुंबिक वादातून आजोबांनी १० वर्षाच्या नातवाचा गळा दाबून खून केल्यानंतर स्वतः सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना कोंढाव्यातील जैन सोसायटीमध्ये शनिवारी पहाटे ६.३०च्या सुमारास घडली असून पुण्यात खळबळ उडाली आहे.
जिनय शहा (वय १०) असे खून झालेल्या नातवाचे नाव असून सुधीर दगडूमल शहा (वय ६५) यांनी नातवाचा खून करून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री शहा कुटुंबातील सर्व जण जेवण करून झोपले. जिनयचे आईवडील बेडरूममध्ये तर जिनय आजोबांसोबत झोपला. पहाटेच्या सुमारास सुधीर यांनी आधी जिनयचा गळा आवळून खून केला, त्यानंतर इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सुधीर यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे का तसेच हे कृत्य नेमके कोणत्या कारणावरून केले याचा तपास सुरु आहे. परंतु कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.