पुणे : रेव्ह पार्टीशी संबंधित प्रकरणात खराडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेले प्रांजल खेवलकर याने जामिनासाठी बुधवारी (दि.६) न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
खेवलकर यांच्यावतीने ॲड. ऋषीकेश गानू व पुष्कर दुर्गे यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. पोलिसांनी २७ जुलै रोजी खराडी येथे छापा टाकून एका हॉटेलमधील रेव्ह पार्टी उधळून सात जणांना अटक केली. यामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह काही महिलांचाही समावेश आहे. अटक केलेल्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या अमली पदार्थ व सायकोट्राँपिक पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ अंतर्गत कलम ८ (क), २० (ब), २१ (ब) , २२ (ब) , २७ अ आणि २९ तसेच सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरात बंदी व व्यापार, उत्पादन, पुरवठा व वितरण नियंत्रण) अधिनियम २००३ मधील कलम २० (७) आणि ७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींना प्रथमवर्गीय न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना वेळोवेळी पोलीस कोठडी सुनावली. यात दि. ३१ जुलै रोजी सत्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.