भोर (पुणे) : भोर तालुक्यात सध्या धुवाधार पाऊस सुरू असून हिर्डोशी खोऱ्यातील शिरवली हि. मा येथे सर्वाधिक सुमारे १४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे डोंगरातील धबधबे ओढे, नाले, नद्या भरून वाहत आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार १८ जुलै २२ जुलै दरम्यान पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार कालपासून भोर तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. भोर तालुक्यात सर्वाधिक पाऊस शिरवली हि. मा येथे झाला आहे. पावसामुळे भोर महाड रस्त्यावरील वरंध घाट भोर मांढरदेवी रस्त्यावरील आंबाडखिंड, घाट परिसरात डोंगर दऱ्यातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहत आहेत. ओढे नाले भरून वाहत आहेत. दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून भात लावणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र अधिक पाऊस असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भोर व वेल्हे तालुक्यात पडत आसलेल्या पावसामुळे निरादेवघर धरण ३६.२५ टक्के, भाटघर धरण ३२.७३ टक्के, गुंजावणी धरण ३३ टक्के भरले आहे.
भोर तालुक्यात पडलेला पाऊस : पांगारी १११ मिलीमीटर, शिरगाव २६ मिलीमीटर, भुतोंडे ३९ मिलीमीटर, हिर्डोशी १६ मिलीमीटर, शिरवली १४२ मिलीमीटर, वेल्हा तालुका गिसर १०० मिलीमीटर, दासवे वरसगाव १०९ मिलीमीटर, भाटघर धराण ८० मिलीमीटर निरादेवर धरण ५८ मिलीमीटर आंबवडे ५० मिलीमीटर संगमनेर २७ मिलीमीटर भोलावडे ३७ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. १८ ते २२ जुलै चार दिवस पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पाऊस जास्त असल्याने प्रशासनाकडून दक्ष राहण्याच्या सूचना हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार अतिवृष्टीचा इशारा दिला होता.