पुणे: दीनानाथ रुग्णालयासमोर बहुतांश राजकीय पक्षांचा आंदोलनाचा गदारोळ सुरू असताना आम आदमी पार्टीच्या (आप) पुणे शहर शाखेने मात्र इथेही वेगळेपण दाखवले. रुग्णालयापासून बाजूला रस्त्याच्या कडेला रांगेत उभे राहून त्यांनी मूक निषेध व्यक्त केला.
गर्भवती महिलेला उपचारासाठी १० लाख रूपये मागितल्यावर तिच्यावर दुसऱ्या रुग्णालयात जाण्याची वेळ आली. त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेची वाच्यता झाल्यावर शुक्रवारी सकाळपासूनच रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची आंदोलने येऊन धडकत होती. घोषणा, फलक, गर्दी यामुळे प्रवेशद्वार गजबजले होते. रुग्णालयातून जाणाऱ्या व येणाऱ्या रुग्णांची वाहनेही त्यामुळे अडून रहात होती. पोलिसांची तसेच रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांची हे सगळे आवरताना तारांबळ उडाली होती.
रुग्णालयाच्या आवारातील हा गोंधळ पाहून तसेच रुग्णालय परिसरात आवाज नको असतो हे लक्षात ठेवून आप च्या पदाधिकाऱ्यांनी लगेचच मूक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी कार्यकर्त्यांना तसे सांगितले. अन्य आंदोलनाचा जोर ओसरल्यानंतर आंदोलन करण्याचे ठरले. त्यानुसार दुपारी ४ वाजता कार्यकर्त्यंनी रस्त्याच्या कडेला एका बाजूला रांगेत उभे राहून या घटनेचा मूक निषेध केला. अमोल काळे, निलेश वांजळे, अमोल मोरे, संतोश काळे, सुभाष करांडे, सुरेखा भोसले, अजिंक्य जगदाळे, वैभव कांबळे, उमेश बागडे, सतीश यादव, प्रशांत कांबळे व अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी यात सहभागी झाले होते.