पुणे पोलिसांचे संकेतस्थळ ‘अनफीट’
By Admin | Updated: January 25, 2015 00:18 IST2015-01-25T00:18:20+5:302015-01-25T00:18:20+5:30
पुण्यामध्ये सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांचा आलेख वाढत असून, पुणे पोलीस मात्र तंत्रज्ञानाचा वापर करण्यात कमी पडताना दिसत आहेत.

पुणे पोलिसांचे संकेतस्थळ ‘अनफीट’
पुणे : बदलत्या काळाप्रमाणे गुन्हेगारीचा ‘टे्रन्ड’ बदलत चालला आहे. पुण्यामध्ये सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांचा आलेख वाढत असून, पुणे पोलीस मात्र तंत्रज्ञानाचा वापर करण्यात कमी पडताना दिसत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून शहर पोलिसांचे संकेतस्थळ ‘अनअपडेट’ असल्यामुळे नागरिकांना चुकीची माहिती मिळत आहे.
‘पुणे पोलीस डॉट जीओव्ही डॉट इन’ असे शहर पोलिसांचे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर नागरिकांच्या सोयीसाठी पोलीस ठाण्यांची माहिती देण्यात आलेली आहे. परंतु बऱ्याच पोलीस ठाण्यांची माहिती अपूर्ण स्वरूपात आहे. काही पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नावे आणि मोबाईल क्रमांक चुकीचे देण्यात आले आहेत. तर, बऱ्याच पोलीस ठाण्यांच्या चौकींची माहितीच संकेतस्थळावर देण्यात आलेली नाही. यासोबतच नव्याने सुरू झालेल्या पोलीस ठाण्यांचे क्रमांक, अधिकाऱ्यांची नावे आणि मोबाईल क्रमांकही अद्याप अपलोड करण्यात आलेले नाहीत. बदलून गेलेल्या काही अधिकाऱ्यांची नावे तशीच ठेवण्यात आलेली आहेत.
खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. जे. चव्हाण यांचे छायाचित्र देण्यात आलेले नाही. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाचे नाव आणि मोबाईल क्रमांक गायब झाला आहे. वारज्याच्या वरिष्ठ निरीक्षकाचा मोबाईल क्रमांक चुकीचा देण्यात आला आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र तोडकर यांची निवडणूक काळात बदली झाली होती. त्यांच्या जागी एस. व्ही. शिंदे यांची तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्यात आली होती. आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा तोडकरांकडे चार्ज देण्यात आला. परंतु, अद्याप शिंदे यांचे नाव आणि छायाचित्रही बदलण्यात आलेले नाही. अशीच परिस्थिती बंडगार्डन पोलीस ठाण्याची आहे. याठिकाणीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून रेहाना शेख यांचे नाव आणि छायाचित्र संकेतस्थळावर झळकत आहे. (प्रतिनिधी)
४डेक्कन विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अरविंद पाटील यांची आणि स्वारगेट विभागाच्या जयवंत देशमुख यांची बदली होऊन बरेच दिवस झाले आहेत. तरीदेखील पोलीस ठाण्यांच्या माहितीमध्ये याच दोघांचा सहायक आयुक्त म्हणून उल्लेख आहे. वास्तविक स्वारगेट विभागाचे एसीपी म्हणून मिलिंद मोहिते हे काम
पाहत आहेत. तर, पाटील यांनी बदलीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. परंतु त्यांच्याकडे सध्या जबाबदारी नाही.
नियंत्रण कक्षाची मदत
नव्याने सुरु झालेल्या वाकड, दिघी, सिंहगड रस्ता, चंदननगर, हडपसर इंटीग्रेटेड पोलीस ठाणे या सर्व पोलीस ठाण्यांची माहितीच संकेतस्थळावर देण्यात आलेली नाही. त्यांचे दूरध्वनी क्रमांक, अधिकाऱ्यांची नावे, मोबाईल क्रमांक यांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना या पोलीस ठाण्यांशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. प्रत्येक वेळी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करुन क्रमांक घ्यावे लागतात.
गेल्या महिन्यात कोरेगाव पार्क येथे सराफी दुकानावर अडीच कोटींचा दरोडा पडल्यानंतर तेथील पोलीस निरीक्षक सुभाष अनिरुद्ध यांनी विशेष शाखेत विनंती बदली करुन घेतली. त्यांची बदली झाल्यानंतरही नवीन अधिकाऱ्यांची माहिती देण्यात आलेली नाही. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची चुकीची माहिती आहे. तर, कोंढवा आणि हडपसर पोलीस ठाण्यांच्या पोलीस चौक्यांचे दूरध्वनी क्रमांकच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत.
पोलिसांकडे अद्ययावत सायबर लॅब आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ आहे. स्वतंत्र सायबर गुन्हे विभाग कार्यरत आहे. मात्र, सायबर गुन्हे विभागाचे उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक कुणीही आपले संकेतस्थळ अपडेट ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत.