Pune Crime: गणेशोत्सवात आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून आयुष कोमकर या महाविद्यालयीन तरुणाचा बळी गेल्याने पुणेपोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अशा पार्श्वभूमीवर आणि नवरात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे.
नवरात्रीच्या पूर्वसंध्येला पुणे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका लावत तब्बल ४३ जणांना तुरुंगात धाडले. ही कारवाई केवळ एका दिवसात पूर्ण करण्यात आली.
टोळी सदस्यांवर पोलिसांचा टार्गेट
या कारवाईत आंदेकर-कोमकरसारख्या गुन्हेगारी टोळ्यांशी संलग्न अनेक गुन्हेगारांचा समावेश आहे. हत्यार कायद्याखालील आरोपी, दारूबंदीच्या गुन्ह्यांतील आरोपी, तसेच कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गंभीर गुन्हे करणाऱ्यांना पोलिसांनी जेलमध्ये रवानगी केली.
गणेशोत्सवानंतर आता नवरात्रीसाठी पोलिस अलर्ट
पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांची दहशत लक्षात घेता नवरात्र काळात विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संशयित आणि पूर्वगुन्हेगारांवर नजर ठेवत पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई वाढवली आहे.