पुणेकरांना पावसाचा सुखद धक्का
By Admin | Updated: June 20, 2015 01:09 IST2015-06-20T01:09:32+5:302015-06-20T01:09:32+5:30
मॉन्सून दाखल झाल्यानंतरही पाऊस नसल्याने डोळे आकाशाकडे लावून बसलेल्या पुणेकरांना आज सकाळी अचानक आलेल्या पावसाने सुखद धक्का दिला.

पुणेकरांना पावसाचा सुखद धक्का
पुणे : मॉन्सून दाखल झाल्यानंतरही पाऊस नसल्याने डोळे आकाशाकडे लावून बसलेल्या पुणेकरांना आज सकाळी अचानक आलेल्या पावसाने सुखद धक्का दिला. आज पहाटेपासून शहरात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पुणेकरांचा दिवस पावसाने सुरू झाला. मात्र, दोन-तीन तास बरसल्यानंतर पाऊस गायब झाला.
गुरुवारी सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ या वेळेत पुण्याच्या मध्यवर्ती भागात २.७ मिमी पाऊस पडला. तर, लोहगाव येथे २.८ आणि पाषाण येथे ३.४ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
पुण्यात मॉन्सून १२ जूनला दाखल झाला. तेव्हापासून शहरात पाऊसच पडलेला नाही. त्यामुळे पुणेकर पावसाची वाट पाहत बसले होते. आज पहाटे अचानक पावसाने बरसण्यास सुरुवात केली. त्याला जोर नव्हता; पण सुमारे दोन-तीन तास तो बरसला. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साठले होते.
त्यानंतर अधूनमधून आकाशात काळ्या ढगांची दाटी होत होती; पण पाऊस मात्र काही पडला नाही.
पुढील २४ तासांत अधूनमधून पावसाच्या सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
(प्रतिनिधी)