सोनसाखळी चोऱ्या रोखण्याचा पुणे पॅटर्न
By Admin | Updated: June 7, 2015 02:56 IST2015-06-07T02:56:17+5:302015-06-07T02:56:17+5:30
गेल्या चार वर्षांपासून पुणेकरांची डोकेदुखी ठरलेले सोनसाखळीचे गुन्हे कमी करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे गुन्हे तब्बल १५० ने कमी झाले आहेत.

सोनसाखळी चोऱ्या रोखण्याचा पुणे पॅटर्न
पुणे : गेल्या चार वर्षांपासून पुणेकरांची डोकेदुखी ठरलेले सोनसाखळीचे गुन्हे कमी करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे गुन्हे तब्बल १५० ने कमी झाले आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यापर्यंत सोनसाखळी चोरीचे ३२२ गुन्हे घडलेले होते. परंतु चालू वर्षात मेअखेरीस १७२ गुन्हे घडलेले आहेत. पोलिसांनी यातील ६६ गुन्हे उघडकीस आणून ३१ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली आहे.
रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या आणि तरुणींच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. नागरिकांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले होते. पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोनसाखळी चोरट््यांनी शहरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती.
आयुक्त पाठक यांनी सोनसाखळी चोरट््यांचा बंदोबस्त करून हे गुन्हे कमी करण्यासाठी नागपूरमध्ये राबवलेल्या उपाययोजना पुण्यात राबवणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार पाठक, सह आयुक्त सुनील रामानंद यांनी योजना तयार करून राज्यातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या ‘इराणी’ चोरट्यांच्या वस्त्यांची माहिती काढली.
या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी पथके तयार करून नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, मुंब्रा, नेरुळ, परळी वैजनाथ, पुण्यातील शिवाजीनगर आदी भागांमध्ये छापे टाकले. या ठिकाणांहून रेकॉर्डवरील तसेच सराईत सोनसाखळी चोरटे ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली.
तपासादरम्यान काही चोरट्यांकडून सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. गेल्या पाच महिन्यांत पोलिसांनी ६६ गुन्हे उघडकीस आणले. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले असले तरी गुन्हे कमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यासोबतच शहरातील रस्त्यांचा अभ्यास करून पोलीस आयुक्त आणि सह आयुक्तांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये फिरून नाकाबंदी पॉइंट निश्चित केले. नाकाबंदी दरम्यान नेमक्या कोणत्या दुचाकी आणि चारचाकी तपासायच्या याच्या सूचना दिल्या. त्याची अंमलबजावणी स्थानिक पोलिसांकडून सुरूआहे. यासोबतच सोनसाखळी चोरट्यांच्या मोठ्या टोळ्याच गजाआड करण्यात यश आल्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. (प्रतिनिधी)
पोलीस आयुक्त के. के. पाठक, सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांच्या सूचनांनुसार गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके तयार करून राज्यातील विविध भागांमध्ये वारंवार छापे टाकण्यात येत आहेत. त्यामुळे सोनसाखळी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या पुण्यातील हालचाली कमी झाल्या आहेत. यासोबतच सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास आता थेट पोलीस निरीक्षक करणार असल्याचे आदेशही पोलीस आयुक्तांनी दिल्यामुळे तपासात प्रगती होत आहे.
- पी. आर. पाटील, उपायुक्त, गुन्हे शाखा